लोकोपयोगी साहित्य वाटपातून क्रिएटिव्ह फाउंडेशनचा नवरात्रोत्सव साजरा

कोथरूड : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने विविध मंडळे, संस्था आणि सामाजिक उपक्रमांसाठी लोकोपयोगी साहित्याचे वाटप करून नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाच्या काळात रोख वर्गणी देण्याऐवजी दीर्घकाळ उपयोगी पडणारे साहित्य भेट देण्याची परंपरा फाउंडेशनने यंदाही जपली.

“विविध संस्था, संघटना आणि मंदिरांना उपयुक्त साहित्याची मदत करणे ही क्रिएटिव्ह फाउंडेशनची परंपरा आहे. यापुढील काळात फाउंडेशनच्या निधीचा अधिकाधिक विनियोग दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरजू रुग्णांना रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विशेष मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्याचा आमचा निर्धार आहे,” असे फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवानिमित्त वस्ती विभागातील अंगणवाडी सेविकांना नामदार चंद्रकांतदादा पाटील व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते स्पीकर सेट भेट देण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका संगीता वांद्रे, अरुणा तोंडे, सुनीता मुटकुळे, नम्रता दहिभाते, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषाताई लडकत आणि कोथरूड महिला आघाडीच्या अध्यक्षा अमृता देवगावकर उपस्थित होत्या.

नळस्टॉप येथील सेंट क्रिस्पीन होममधील मुलींना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते पेंटिंग किट भेट देण्यात आले. यावेळी माधवी सॅम्युल आणि फाउंडेशनचे विश्वस्त प्रतीक खर्डेकर उपस्थित होते. आवडीचे गिफ्ट मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद दिसून आला, असे मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.

तसेच शीतळादेवी मंदिराला खुर्च्या भेट देण्यात आल्या. यावेळी मंदिराचे अध्यक्ष कुणाल तोंडे यांच्यासह सागर तांगडे, उमेश धाडवे, शुभम वीर, गणेश गवारे आणि अनिकेत मचले उपस्थित होते.

“सामाजिक बांधिलकी जपत गरजू संस्था आणि घटकांना प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या साहित्याच्या माध्यमातून मदत करणे, हीच क्रिएटिव्ह फाउंडेशनची ओळख आहे,” असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

See also  सुस गावात लहू बालवडकरांचा दोन दिवसांच्या गाव भेट दौऱ्यात स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग