पुणे : आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव पुण्यात आयोजित ऐतिहासिक ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेने दुसऱ्या दिवशी अधिकच थरारक वळण घेतले. ‘मराठा हेरिटेज सर्किट’ या दुसऱ्या टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाचा सायकलपटू ल्यूक मडग्वे याने सलग दुसरा विजय मिळवत ‘यलो जर्सी’वरील आपले वर्चस्व कायम राखले. या वेळी आमदार भीमराव तापकीर आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आदी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी सायकलपटूंचा गौरव करण्यात आला.
आजचा दुसरा टप्पा ‘मराठा हेरिटेज सर्किट’ अंतर्गत १०५.३ किलोमीटरचा होता. पुण्याच्या कॅम्प परिसरातील लेडीज क्लब येथून दुपारी १२.३० वाजता शर्यतीला प्रारंभ झाला, तर सिंहगड रोडवरील नांदेड सिटी येथे समारोप झाला. डोंगराळ भूभाग, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे हा टप्पा सायकलपटूंच्या ताकद, तंत्र आणि सहनशक्तीची कसोटी पाहणारा ठरला.
ल्यूक मडग्वे याने ०२:३१:४९ या वेळेत शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. थायलंडच्या ‘रुजाई इन्शुरन्स’ संघाचा अॅलन कार्टर बेटल्स दुसऱ्या, तर बेल्जियमचा यॉर्बन लॉरिसेन तिसऱ्या क्रमांकावर राहिला. दुसऱ्या टप्प्यानंतर विविध श्रेणींतील जर्सी विजेते पुढीलप्रमाणे ठरले आहेत: यलो जर्सी (एकूण आघाडी) : ल्यूक मडग्वे (चीन), पोल्का डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स) : स्टीफन बेनेटन (गुआम), ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलपटू) : जंबालजाम्ट्स सेनबायर (मंगोलिया/स्पेन), व्हाईट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा सायकलपटू) : तिजसेन विगो (नेदरलँड्स), तर ब्ल्यू जर्सी (भारताचा सर्वोत्तम सायकलपटू) : मनव सरदा (इंडियन डेव्हलपमेंट टीम).
ही स्पर्धा भारतातील सायकलिंग क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरत असून UCI 2.2 श्रेणीतील ही देशातील पहिली पाच दिवसांची मल्टि-स्टेज ‘कॉन्टिनेंटल सायकल रेस’ आहे. पाच खंडांतील ३५ देशांचे १७१ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एकूण ४३७ किलोमीटरचा मार्ग पुणे जिल्ह्यातील ९ तालुके आणि १५० गावांतून जात असून, अवघ्या ७५ दिवसांत जागतिक दर्जाच्या या स्पर्धेसाठी रस्ते व पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत.
विजयानंतर बोलताना ल्यूक मडग्वे म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत उष्ण होता आणि चढाव खूप आव्हानात्मक होते; मात्र संघातील सहकाऱ्यांच्या उत्तम साथीतून हा विजय मिळवता आला.”
स्पर्धेचा तिसरा टप्पा उद्या, २२ जानेवारी २०२६ रोजी ‘वेस्टर्न घाट गेटवे’ अंतर्गत पुरंदर ते बारामती (१३४ किमी) दरम्यान पार पडणार असून, या टप्प्यात पुणेकरांना जागतिक दर्जाच्या सायकलपटूंच्या वेगवान आणि थरारक कामगिरीचा अनुभव घेता येणार आहे.
























