शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो सुरू होण्याची प्रतीक्षा कायम; ‘दहा दिवसांत सुरू’चे आश्वासन हवेतच! रखडलेल्या मेट्रोमुळे प्रवाशांचा मनस्ताप, रस्त्यांच्या दुरवस्थेवरही प्रश्नचिन्ह

पुणे : शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो सेवा दहा दिवसांत सुरू होणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, एक महिना उलटूनही मेट्रो सेवा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार दिली जाणारी आश्वासने आणि प्रत्यक्षात सुरू न होणारी सेवा यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून या मेट्रोची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना प्रत्येक वेळी नव्या तारखा आणि आश्वासनांचा सामना करावा लागत आहे. ‘दहा दिवसांत मेट्रो सुरू होणार’ अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, अद्याप सेवा सुरू न झाल्याने ही आश्वासने नेमकी कशासाठी दिली जातात, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

खोटी आश्वासने देण्यापेक्षा स्पष्ट तारीख जाहीर करा!
मेट्रो सुरू होण्याची नागरिकांना घाई आहेच; मात्र, वारंवार तारखा जाहीर करून त्या पाळल्या जात नसतील, तर नागरिकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागतो. मेट्रो प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी जितका वेळ लागणार असेल, तितका वेळ लागो; परंतु निश्चित माहिती नसताना दहा दिवसांत सेवा सुरू होईल, अशी आश्वासने देऊन नागरिकांच्या अपेक्षा वाढवू नयेत, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

पुण्यात वाहतूक व्यवस्था कोलमडली; रस्त्यांच्या दुरवस्थेचाही प्रश्न
पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत असून उपनगरांमध्ये वाहतूक नियोजनासाठी आवश्यक मनुष्यबळही अपुरे पडत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. मेट्रोच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली रस्त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

मेट्रो मार्गावरील जाहिरात फलक आणि अपूर्ण कामांवर प्रश्न
मेट्रो प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला मिळाल्याचे सांगितले जात असतानाही मेट्रो मार्गावरील काही कामे आणि स्थानकांवरील सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचा दावा नागरिक करत आहेत. त्याचबरोबर मेट्रो मार्गावर जाहिरात फलकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, काही ठिकाणी धोकादायक पद्धतीने लटकवण्यात आलेल्या होर्डिंगमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. मेट्रो सेवा सुरू होण्याबरोबरच स्थानकांवरील अपूर्ण कामे, प्रवाशांच्या सुविधा, जाहिरात फलकांची सुरक्षितता आणि मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती याकडेही संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

See also  पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस हुतात्मा स्मृती स्मारकाला अभिवादन

आता नागरिकांना आश्वासन नको, प्रत्यक्ष मेट्रो सेवा हवी!
शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो सेवा नेमकी कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाने स्पष्ट आणि अधिकृत माहिती द्यावी. वारंवार तारखा जाहीर करून त्या पाळण्यात अपयश येण्यापेक्षा वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी. तीन वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना आता केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू झालेली पाहायची आहे.

पुणे शहर महिला कार्याध्यक्ष NCP वैशाली कमाजदार म्हणाल्या, नागरिकांना खोटे आश्वासने देण्यापेक्षा मेट्रोची कामे वेळेवर पूर्ण करून प्रत्यक्षात मेट्रो सुरू झाल्यानंतरच त्याचे श्रेय घेतलेले पाहिजे. अद्याप मेट्रो स्टेशनची कामे पूर्ण झालेली नाहीत.