पाटील इस्टेटमध्ये चेंबरचे झाकण तुटलेले; दोन दिवसांत दुरुस्ती करण्याची मनसेची मागणी; लहान मुलगा जखमी

पुणे : पाटील इस्टेट परिसरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उड्डाणपुलाखाली छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ, पाटकर प्लॉट येथील माधुरी स्नॅक्स सेंटरसमोर पावसाळी गटाराच्या चेंबरचे झाकण गेल्या अनेक महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, येत्या दोन दिवसांत चेंबरचे झाकण दुरुस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

सदर रस्ता अरुंद असून, जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा भाग असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही सतत वर्दळ असते. तुटलेल्या चेंबरमुळे दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांचे टायर अडकून नुकसान झाल्याचे तसेच लहान-मोठे अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्याच आठवड्यात एका लहान मुलाचा पाय चेंबरमध्ये अडकून तो जखमी झाल्याची घटना घडल्याचेही सांगण्यात आले.

तात्पुरती उपाययोजना म्हणून नागरिकांनी चेंबरवर लाकडी दरवाजा ठेवला आहे. मात्र, सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे तोही तुटत असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या समस्येबाबत स्थानिक नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी मनसेच्या पाटील इस्टेट येथील कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर पुणे महापालिका आयुक्त, छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आणि पथ विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसांत चेंबरचे झाकण दुरुस्त न केल्यास संबंधित कार्यालयासमोर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी अँथोनी आढाव, संजय तोडमल, केरबा जौंजट, राजू भेकरे, रमेश साठे, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  डॉ. विजय भटकर यांनी पुणे जिल्हा परिषदेसोबत २५ स्किल स्कूल्स सुरू करण्यासाठी भागीदारी स्वीकारली