पुणे : बाणेर आणि गणेशखिंड रस्त्यावरील प्रलंबित विकासकामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित यंत्रणांना दिले. रस्त्यांच्या कामांचा दर्जा आणि टिकाऊपणा सुधारण्यासह वाहतूक व्यवस्था, रस्ते सुरक्षा आणि प्रलंबित कामे यांचा महापालिका मुख्य भवनात आयोजित बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीला पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त अभिजित चौधरी, पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महापालिकेच्या संबंधित विभागांचे खातेप्रमुख तसेच टाटा प्रोजेक्ट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा न्यायालय ते बालेवाडी या मेट्रो मार्ग क्रमांक ३ अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि अन्य विकासकामांच्या गुणवत्तेबाबत आयुक्तांसह जिल्हाधिकारी आणि पीएमआरडीए आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. विशेषतः मध्य दुभाजकांच्या कामांमध्ये योग्य रेषा व पातळीचा अभाव, अपूर्ण फिनिशिंग आणि देखरेखीतील त्रुटी निदर्शनास आल्या.
या त्रुटींची तातडीने दुरुस्ती करून कामांचा दर्जा सुधारण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. तसेच मेट्रो मार्गावरील प्रलंबित कामे, रस्ते, पदपथ, चौक सुधारणा, वाहतूक व्यवस्था, रस्ते सुरक्षितता, युटिलिटी चर आणि मॅनहोल यांसंबंधीच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
शहरातील रस्ते विकासकामे दर्जेदार, सुरक्षित आणि टिकाऊ व्हावीत, तसेच नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
















