बालेवाडी : कस्पटे वस्ती ते बालेवाडी गावातील सर्वे क्रमांक ४६ ला जोडणारा पूल गेल्या १४ वर्षांपासून दगडधोंड्यांनी भरलेल्या अवस्थेत पडून आहे. या पुलाचा वापर नागरिकांना करता येत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुढाकार घेत पुलाचे प्रतीकात्मक उद्घाटन केले. यावेळी पुणे महानगरपालिका व शासनाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.
महत्त्वाचा संपर्कमार्ग असूनही हा पूल इतकी वर्षे वाहतुकीसाठी खुला न झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे महानगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलावरील दगडधोंडे हटवावेत आणि तो तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“पुणे महापालिकेला जरा जरी लाज असेल, तर त्यांनी हा पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करावा,” अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर, पक्षाचे उपाध्यक्ष हनुमंत बालवडकर, मुळशी तालुका पदाधिकारी लक्ष्मण पाडाळे, गोरक्षणचे संदीप बालवडकर, आनंदा कांबळे पाटील, नरेंद्र बालवडकर, चंद्रशेखर बालवडकर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
१४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांना वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
















