कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी २८ आणि ३० एप्रिल रोजी मतदान

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून याअंतर्गत १४७ बाजार समित्यांचे मतदान २८ एप्रिल तर ८८ बाजार समित्यांचे मतदान ३० एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे.

प्राधिकरणाने २१ मार्चच्या आदेशानुसार २५३ कृषि उत्पन्न बाजार समित्याची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. त्यतील १८ बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित २३५ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे.

या निवडणुकीअंतर्गत एकूण ४ हजार ५९० जागा निवडून द्यायच्या होत्या. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये २ हजार ८०५ पदांपैकी १८ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी ६ हजार २३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात १ हजार २० पदांपैकी २१ जागा बिनविरोध झाल्या असून २ हजार ४५७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. व्यापारी/अडते मतदार संघात ५१० पदांपैकी ४९ बिनविरोध तर उर्वरित जागांसाठी १ हजार ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हमाल/मापारी मतदार संघामध्ये २५५ पदांपैकी ६४ जागा बिनविरोध झाल्या असून ६०६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

२८ एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी ३७ बाजार समित्यांची मतमोजणी २८ एप्रिल रोजी, ९५ समित्यांची मतमोजणी २९ एप्रिल रोजी तर १५ समित्यांची मतमोजणी १ मे रोजी होणार आहे. ८८ पैकी ७८ समित्यांची मतमोजणी ३० एप्रिल रोजी तर १० समित्यांची मतमोजणी १ मे रोजी होणार आहे, असेही डॉ. खंडागळे यांनी कळविले आहे.

See also  सोमेश्वरवाडी येथील रामनदी कुंडावर दीपोत्सव साजरा