पुणे : जुन्या पुणे- मुंबई रस्त्याचे रुंदीकरण, खडकी- बोपखेल, बोपोडी – सांगवी यांना जोडणाऱ्या पुलाचे नव्याने बांधकाम, नदी सुधारणे अंतर्गत पाटील इस्टेट ते मुळा येथील नदीकाठचे सुशोभीकरण, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या टाळण्याकरीता नवीन ड्रेनेज लाईनचे हाती घेण्यात आलेले काम यांसारखी अनेक कामी मार्गी लावण्यासोबतच खास खडकी कॅन्टोन्मेंटमधील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून आणलेला १५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी यांमुळे खडकी कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांचा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मोठा पाठींबा मिळत आहे. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार असलेल्या शिरोळे यांना मोठ्या फरकाने निवडून आणू असा निर्धार खडकी परिसरातील नागरीकांनी केला आहे.
विधानसभा प्रचाराच्या निमित्ताने नुकतेच शिरोळे यांच्या पदयात्रेचे आयोजन खडकी भागात करण्यात आले होते यावेळी राजीव गांधी चौपाटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, राष्ट्रीय मित्र मंडळ, इंदिरा वसाहत, गवळी वाडा, दुर्गा वसाहत, पंकज मित्र मंडळ, इदगाह मैदान आणि राम मंदिर परिसरात शिरोळे यांनी पदयात्रा काढली होती. यावेळी या भागातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरीकांनी शिरोळे यांची भेट घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले.
नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी मी कायमच त्यांच्या सोबत असतो आणि म्हणूनच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील प्रश्न सोडविण्याला मी कायमच प्राधान्य दिले आहे असे सांगत शिरोळे म्हणाले, “विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपूल, पुणे मेट्रो, रस्त्यांचे रुंदीकरण, चाळीस दशलक्ष लिटर पाणी साठविले जाईल अशा आठ ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या, आरोग्य सेवेसाठी एम्स संस्थेची उभारणी अशा अनेक महत्त्वाच्या विकास कामांचा समावेश खडकी मतदार संघात आहे. हे सर्व काम करीत असताना सर्वसामान्य स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वाड्या वस्त्यांवर शंभराहून अधिक कार्यक्रमांचे केलेले आयोजन, वेळीवेळी घेतलेल्या बैठका, चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यामुळेच खडकी भागातील नागरिकांना दिलास मिळू शकला आहे.”
नजीकच्या भविष्यात खडकी रेंज हिल्स येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येईल. रेल्वे व महानगरपालिकेशी संवाद साधत या प्रस्तावावर अंमलबजावणी करण्याचे ठरविले गेले असून यानुसार हा मार्ग सहावरून १८ मीटर करण्यात येणार आहे. यासोबतच पुणे रेल्वे स्थानकासोबत खडकी व शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचे देखील विस्तारीकरण करण्यात येईल. पुणे ते लोणावळा दरम्यान सध्याच्या दोन ऐवजी तीन ते चार मार्गिका करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली असून त्याचेही काम सुरु होईल. केंद्र व राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणारा अमृत भारत हा प्रकल्प झाल्यानंतर रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल तसेच लोकल रेल्वेच्या फेऱ्याही वाढतील अशी माहिती शिरोळे यांनी यावेळी दिली.
खडकी बोपोडी भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या परीसरात बंद झालेल्या पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असून सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेत सायबर सेलच्या माध्यमातून या संदर्भातील तक्रारींची सखोल चौकशी व उपाययोजना करण्याचा मुद्दा देखील विधानसभेत शिरोळे यांनी उपस्थित केला आहे.























