कोथरुडमध्ये १ हजारांहून अधिक बालकांचा अनोखा बालदिन सोहळा ; चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून सुरक्षित मातृत्वाचा उपक्रम

पुणे : मातृत्वाचा प्रवास प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा असला, तरी आर्थिक परिस्थिती आणि आरोग्यविषयक अडचणींमुळे अनेक महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा गरजू महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी मदतीचा आधार देण्याच्या उद्देशाने कोथरुडमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘सखी–सुखदा’ उपक्रमातून आतापर्यंत एक हजारांहून अधिक मातांची सुखरूप प्रसूती झाली आहे. या उपक्रमातून जन्मलेल्या चिमुकल्यांसाठी बालदिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सखी–सुखदा फाउंडेशनच्या माध्यमातून वस्ती भागातील गरजू गरोदर महिलांना सुरक्षित मातृत्वासाठी मदत केली जाते. आर्थिक अडचणींमुळे प्रसूतीच्या काळात महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना येणारा ताण कमी करून त्यांना आवश्यक आधार देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या उपक्रमातून जन्मलेल्या नवजात बालकांना खेळणी आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि मातांच्या चेहऱ्यावरील समाधानामुळे कार्यक्रमाला आनंदी आणि आपुलकीचे स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी बोलताना उपक्रमाच्या संचालिका स्मिता पाटील म्हणाल्या, “आर्थिक परिस्थितीमुळे वस्ती भागातील अनेक गरोदर महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या सखी–सुखदा उपक्रमामुळे आतापर्यंत एक हजारांहून अधिक मातांच्या आयुष्यात आनंद फुलवता आला आहे. एका सुरक्षित प्रसूतीमुळे केवळ एका आईलाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला आनंद मिळतो. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकीचा उत्सव आहे.”

सुरक्षित प्रसूतीतून जन्माला आलेल्या बालकांचा आनंद साजरा करण्याबरोबरच प्रत्येक आईला मातृत्वाच्या प्रवासात आधार मिळावा, हा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला. सुरक्षित जन्माचा हक्क आणि प्रत्येक मातेला आवश्यक आरोग्यविषयक मदत मिळावी, या सामाजिक भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेखा जगताप, डॉ. मुग्धा धायगुडे, धनश्री चितळे, अस्मिता शिंदे, वृषाली मोरे, वैष्णवी केंडे आणि पौर्णिमा सोनार यांनी विशेष मेहनत घेतली.

See also  देहू ते आळंदी पालखी मार्ग “संतभूमी” म्हणून जाहीर करा – अभय टिळक