पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दहाव्या दिवशी अखेरच्या साखळी सामना नाट्यपूर्ण ठरला.. पहिल्या डावात मनोज यादव(५-६)ने केलेली हॅट्रिक कामगिरी आणि दुसऱ्या डावात अंकित बावणेने सलग एकाच षटकात सलग सहा चौकारासंह नाबाद ६२ धावांची खेळी पाहायला मिळाली. कोल्हापूर टस्कर्स संघाने ईगल नाशिक टायटन्स संघावर ९ गडी राखून विजय मिळवत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावातील अखेरचे आणि दुसऱ्या डावातील तिसरे षटक हे या सामन्यातील वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
सामन्यात नाशिकच्या सिद्धेश वीरने सुरुवातीला २५ चेंडूत २चौकार व २ षटकारासह ३४ धावा, तर मंदार भंडारीने १२ चेंडूत ३चौकार व २ षटकारासह २७ धावा केल्या. या जोडीने पहिल्या विकेटसाठी २४ चेंडूत ४३ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. नाशिक संघ ४ षटकात १बाद ४३ धावा असा सुस्थितीत होता. त्यानंतर कोल्हापूर संघाच्या श्रेयस चव्हाण(१-१६),तरणजीत ढिलोन(१-७) यांनी सुरेख गोलंदाजी करत नाशिकच्या राहुल त्रिपाठी(५धावा), धनराज शिंदे(१५धावा)यांना बाद करून ७.५ षटकात ३बाद ७५ असा अडचणीत टाकला. सामन्यातील अखेरचे षटक नाट्यमय ठरले. षटकाच्या आधी शुभम नागवडे रिटायर झाला. त्यानंतर मनोजने पहिल्याच चेंडूवर कौशल तांबेला उत्तुंग फटका मारताना झेल बाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या ऋषभ कारवाने एक धाव घेतली. पण तिसऱ्याच चेंडूवर सलामवीर सिद्धेश वीरला त्रिफळा बाद झाला. चौथ्या चेंडूवर आदित्य राजहंसदेखील त्रिफळा बाद झाला, तर पुढच्याच चेंडूवर प्रशांत सोळंकीला झेल बाद करून मनोज यादवने स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली. विशेष म्हणजे शेवटच्या चेंडूंवर साहिल औताडेने धावबाद करून एकाच षटकात चार गडी बाद, एक धावचीत अशा अनोख्या कामगिरीची नोंद केली. प्रशांतच्या बळीबरोबरच मनोजचे सामन्यात पाच बळी झाले.
८९ धावांचे आव्हान कोल्हापूर टस्कर्स संघाने ९ षटकात १बाद ९२धावा करून पूर्ण केले. एमपीएल स्पर्धेत पहिले शतक ठोकणारा अंकित बावणे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अंकित ६ धावांवर खेळत असताना चौफेर चौकारांची आतिशबाजी केली. त्याने नाशिकचा फिरकीपटू प्रशांत सोळंकीला त्याच्या पहिल्याच षटकात ६ चेंडूत सलग ६चौकार मारले. यंदाच्या एमपीएलमधील अशी कामगिरी करणारा अंकित पहिलाच खेळाडू ठरला. अंकित(धावा) व केदार जाधव(७धावा)यांनी १९ चेंडूत ३७ धावांची धडाकेबाज सलामी दिली. केदार जाधव ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर अंकित बावणेने २६ चेंडूत ११चौकारासह नाबाद ६२ धावांची तुफानी खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अंकितला नौशाद शेखने नाबाद २० धावा काढून त्याला साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ३५ चेंडूत ५५ धावांची भागीदारी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: ईगल नाशिक टायटन्स: १० षटकात ९ बाद ८८धावा (सिद्धेश वीर ३४(२५,२x४,२x६), मंदार भंडारी २७(१२,३x४,२x६), धनराज शिंदे १५, मनोज यादव ५-६, तरणजीत ढिलोन १-७, श्रेयस चव्हाण १-१६) पराभुत वि.कोल्हापूर टस्कर्स: ९ षटकात १बाद ९२धावा(अंकित बावणे नाबाद ६२(२७,११x४), नौशाद शेख नाबाद २०(१७,१x६), रेहान खान १-१६); सामनावीर-मनोज यादव; कोल्हापूर टस्कर्स संघ ९ गडी राखून विजयी.