पुण्याच्या विकासातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमोल बालवडकर यांचा पुढाकार; बालेवाडी-वाकड जोडरस्त्याचे भूसंपादन आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीमच्या अंमलबजावणीला गती देण्याची आयुक्तांकडे मागणी

पुणे : शहरातील महत्त्वाच्या विकासकामांना गती देऊन दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. प्रलंबित प्रकल्पांमधील प्रशासकीय अडथळे दूर करून कामांची अंमलबजावणी वेगाने करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

या भेटीदरम्यान बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीम या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला. बालेवाडी-वाकड जोडरस्त्याच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असलेली उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी बालवडकर यांनी केली.

तसेच म्हाळुंगे टी.पी. स्कीमच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय अडचणी दूर करून आवश्यक प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी, जेणेकरून या योजनेला गती मिळेल आणि परिसराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. याशिवाय शहरातील अन्य विकासकामांची सद्यस्थिती, विविध प्रकल्पांमधील अडथळे आणि प्रलंबित प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.

नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विकासाचे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून प्रभावीपणे मार्गी लागावेत, यासाठी नियोजन, समन्वय आणि पाठपुरावा आवश्यक आहे. शहराच्या विकासासाठी प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.

See also  निमगाव म्हाळुंगी–रांजणगाव सांडस पंचायत समिती गणात भाजपच्या बापूसाहेब काळे यांना विजयी करण्याचा नागरिकांचा निर्धार