पिरंगुट : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रा. ईश्वर हेमके यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया असून प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांचा आदर करून त्यानुसार आचरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बी. जी. लोबो होते. यावेळी डॉ. हरिश्चंद्र तिंबोळे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून उपस्थितांना संविधानाचे पालन करण्याची प्रतिज्ञा दिली. विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्त्व आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी याविषयी विचार व्यक्त केले.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना व पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या शौर्याचे आणि देशसेवेचे स्मरण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश चौधरी यांनी केले, तर प्रा. अविनाश हुंबरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.
















