राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांकडून सफाई कामगारांच्या समस्यांचा आढावा

पुणे : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विविध विभागांकडील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सल्लागार गिरेंद्र नाथ, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधीष्ठाता डॉ. नरेश झांजड आदींसह सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे ग्रामीण हद्दीत मागील काळात झालेल्या सफाई कर्मचारी मृत्यू प्रकरणातील आर्थिक मदतीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, असे निर्देष श्री. वावा यांनी दिले.

काम करत असताना मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेळेत नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यासाठी संवेदनशीलपणे काम करावे, वारसांना घरकुल योजनेतून पक्का निवारा उपलब्ध करुन देणे, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा. विविध योजनांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांची कर्जप्रकरणे बँकेतून गतीने मार्गी लावावीत, असे निर्देशही श्री. वावा यांनी दिले.

सफाई कर्मचाऱ्यांची प्रकरणे, त्यांच्या समस्या गतीने मार्गी लावण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल असा विश्वास विभागीय आयुक्त श्री. राव यांनी व्यक्त केला.

डॉ. कुणाल खेमनार यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय विमा योजना, सुरक्षा साधनांचा पुरवठा, पाल्यांना शैक्षणिक सहाय्य आदी कल्याणकारी योजनांची माहिती दिली. दोन्ही महानगरपालिका तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी याविषयीदेखील बैठकीत आढावा घेण्यात आला.

बैठकीस विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त सचिन इथापे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, समाज कल्याण आयुक्तालयाचे उपायुक्त प्रशांत चव्हाण, सहायक आयुक्त समाजकल्याण संगीता डावखर आदी उपस्थित होते.

See also  राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात पुणे विभागातील सर्व कार्यालयांनी सहभाग घ्यावा--विभागीय आयुक्त सौरभ राव