पिंपरी : तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आवारे कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी “माझा मुलगा तळेगावकरांची प्राणपणाने सेवा करत होता. तळेगावकरांना न्याय पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,” अशी मागणी केली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची मागणी किशोर आवारे यांच्या पत्नीने नामदार पाटील यांच्याकडे केली.
यावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना धीर दिला. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.