सातव्या जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : सातव्या युएन जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ते सुरक्षितेतच्यादृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, वाहन वितरक, मोटार वाहन प्रशिक्षण संस्था, पीयूसी केंद्र, रेट्रोफिटमेंट केंद्र, वाहतूकदार संघटना तसेच सामाजिक संस्थेमार्फत ‘रस्ता सुरक्षा’ या विषयावर वॉकेथानचे आयोजन करणे, सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर करण्याकरिता नागरिकामध्ये प्रबोधन करणे, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वॉक ऑन राईट बाबत जनजागृतीपर कार्यक्रम करणे, व्याख्याने आयोजित करणे, माहितीपत्रके वाटणे तसेच प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

रस्ते अपघाताचे प्रमाण विचारात घेऊन त्याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या जनजागृती होण्यासाठी २१ मे पर्यंत ‘शाश्वत वाहतूक’ या विषयासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांप्रती स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे. रस्ते अपघातातील जखमींना वेळेत व योग्य उपचार व मदत मिळवून देणे हेदेखील यात अंतर्भूत असल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

See also  महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू