राज्यात १५ हजार महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र-समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

पुणे : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी देशात प्रथमच राज्यातील १५ हजार महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र समाज कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

सामाजिक न्याय भवन येथे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ आणि जिल्ह्यातील विविध योजनांचा लाभार्थ्यांच्या यशोगाथा पुस्तिका प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संतोष जाधव , विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुरे, समाज कल्याण अधिकारी मीना आंबाडेकर यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. नारनवरे म्हणाले, शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांविषयी येणाऱ्या अडचणी व त्यांचे प्रश्न याचे निराकरण महाविद्यालयस्तरावरच व्हावे, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे व त्यातून समाजामध्ये जनजागृती करणे यासाठी समान संधी केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यातील महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समाज संधी केंद्रातील प्राध्यापक, सभासद, संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासाठी लवकरच राज्यस्तरावर महासंमेलन आयेाजित करणार असल्याचेही आयुक्त डॉ. नारनवरे म्हणाले.

कुलसचिव डॉ.पवार म्हणाले, देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण २७ टक्के असून त्यात मागासवर्गीय समाजाचे प्रमाण अत्यल्प आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व त्यातून लोककल्याण साधण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अनेक बदल करणे आवश्यक आहे. त्या बदलांसाठी समान संधी केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. समाज कल्याण विभागाच्या योजनांबरोबरच समाजासाठी व विद्यार्थांसाठी उपयुक्त असलेल्या सर्वच विभागाच्या योजनांची माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठामार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे डॉ. पवार म्हणाले.

श्री. सोळंकी यांनी प्रस्ताविकात पुणे विभागात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला व राज्यात योजनांची अंमलबजावणी करण्यात पुणे विभाग अग्रेसर असल्याचे नमूद केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वाधार योजनेचा लाभ दिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.

See also  अमोल बालवडकर यांच्या वतीने रविवारी १५ हजार कुटुंबांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिपावली सरंजाम वाटप