पुणे : ब्ल्यू बेल्स हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, कोंढवा या शाळेतील इयत्ता ९ वी १० वीच्या माध्यमिक वर्गांना शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये अनधिकृत वर्ग म्हणून घोषित करण्यात आले असून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये अद्याप मान्यता नसल्याने या शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने माहिती दिली आहे. या शाळेतील इयत्ता ९ वी १० वीचे वर्ग शासन मान्यतेशिवाय शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये सुरू असल्याचे आढळून आले होते. या वर्गाना अनधिकृत वर्ग म्हणून घोषित करण्यात येवून वर्ग बंद करणेबाबत शाळेला आदेशित करण्यात आले होते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये अद्यापही या शाळेतील वर्गांना मान्यता नसल्याने अनधिकृत वर्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या पाल्यास या अनधिकृत शाळांमध्ये दाखल करु नये.
पालकांना अनधिकृत शाळांबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी स्थानिक महानगरपालिका क्षेत्रातील क्षेत्रिय अधिकारी (शिक्षण) तसेच पंचायत समिती कार्यालयात गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.