बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन

पुणे : जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी स्पष्ट केले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.

जनावरांच्या वाहतुकीसाठी विशेष परवान्यासाठी ऑनलाईन पद्धतीने https://parivahan.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करुन त्याचे शुल्क याच संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जमा करावे. त्यानंतर संबंधित वाहनात आवश्यक ते बदल करुन वाहन तपासणीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयात कार्यरत मोटार वाहन निरीक्षक यांच्यासमोर सादर करावे.

प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ च्या नियम ९६ मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण, भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी वा व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. असे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे.

प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६०, प्राण्यांच्या वाहतूकीचे नियम १९७८ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये. या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी कळवले आहे.

See also  राज्यात कायदा आणि सुरक्षेचे तीन तेरा आपचा आक्रोश मोर्चा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी