पुणे : जिल्ह्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जोरदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत शासनाच्या विविध योजना व सेवांचे २ लाख ८६ हजार २७८ लाभ नागरिकांना वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीदेखील या अभियानात सहभाग घेतला आहे.
जिल्ह्याने उत्तम नियोजनाच्या माध्यमातून ३१ मे रोजी एकाच दिवशी नागरिकांना १ लाख ८१ हजार विविध योजना व सेवांचा लाभ दिला होता. या कामगिरीत सातत्य ठेवत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत तालुकास्तरावर विविध ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कृषि, महिला व बालविकास, पंचायत समिती, पशुसंवर्धन, महसूल, महानगरपालिका, नगरपालिका, निवडणूक शाखा, शिक्षण विभाग, मनरेगा आदी विविध विभागांनी या मेळाव्यांमध्ये सहभाग घेतला.
नागरिकांना लाभ देण्यापूर्वी गावपातळीवर या अभियानाची माहिती देण्यात येऊन नागरिकांकडून लाभासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीदेखील देण्यात आली. स्थानिकरित्या आयोजित मेळाव्याच्या ठिकाणी विविध दालनाद्वारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याच ठिकाणी लाभाचे वाटपही करण्यात आले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व व्यवस्था असल्याने प्रशासनाच्या या पुढाकाराबाबत नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. वेळ आणि खर्चात बचत होत असून हा उपक्रम पुढेही सुरू ठेवावा अशी प्रतिक्रीया व्यक्त करून लाभार्थ्यांनी शासनाला धन्यवादही दिले आहेत.
अभियानांतर्गत पुणे शहरात १७ हजार ५९३, हवेली २८ हजार ७७९, मुळशी ३ हजार ९५०, भोर २८ हजार ४४२, मावळ १५ हजार ६२२, वेल्हे ८ हजार ५७६, जुन्नर ३५ हजार ९८३, खेड १० हजार ८३७, आंबेगाव २४ हजार २०३, शिरुर ३४ हजार ४४९, बारामती २४ हजार ५९६, इंदापूर ३६ हजार ८४३, दौंड ७ हजार ६०३, पुरंदर ८ हजार ३६० आणि अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवडच्या कार्यक्षेत्रात ४४२ लाभाचे वाटप करण्यात आले.
अभियानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याचा त्रास वाचावा आणि वेळेत त्यांना लाभ मिळावा असे प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अभियानात चांगला सहभाग घेतला असून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आवश्यक दाखलेदेखील मोहिमस्तरावर देण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे.