भोर व वेल्हे तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

पुणे दि. २६: भोर उपविभागातील भोर व वेल्हे तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा दोन्ही तालुक्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन स्थगित करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती.

भोर व वेल्हा तालुके हे दुर्गम व डोंगराळ व अतिवृष्टीप्रवण असून सद्यस्थितीमध्ये पावसाला मोठ्या प्रमाणात सुरवात झालेली आहे. तालुक्यामध्ये दरडग्रस्त गावे असून नैसर्गिक आपत्तीच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत असून महसूल यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात व्यस्त आहे. दोन्ही तालुक्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घाट प्रवण क्षेत्र असून घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक असल्याने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात उपविभागीय अधिकारी कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच क्षेत्रिय स्तरावरील कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित लेखी परीक्षा घेणे प्रशासकीय कारणास्तव शक्य होणार नसल्याने १ ऑगस्ट रोजी नियोजित लेखी परीक्षा पुढील तारखेपर्यंत तूर्त स्थगित करण्यात आली आहे. भोर उपविभागीय कार्यालयाकडून लेखी परीक्षेचा दिनांक व स्थळ तसेच त्यापुढील कालबद्ध कार्यक्रमाबाबत अवगत करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

See also  क्रीडानगरी महाळुंगे बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन आयोजित योग शिबिरात ३००० नागरिकांचा सहभाग