पीआयसीटी महाविद्यालयात पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा गौरव

कात्रज, पुणे: पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) महाविद्यालयातर्फे विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

पीआयसीटी ही संस्था सोसायटी फॉर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (SCTR) अंतर्गत कार्यरत आहे. या कार्यक्रमास SCTR चे व्यवस्थापकीय विश्वस्त माननीय श्री. आर. एस. कोठावळे, सचिव माननीय श्री. स्वस्तिक सिरसीकर आणि इतर विश्वस्त सभासद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पीआयसीटीचे संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे आणि रजिस्ट्रार श्री. अंकुश सपकाळ आदी उपस्थित होते.

डॉ. प्रभाकर कोरे यांनी शिक्षण, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात व्यापक व भरीव कार्य उभारले आहे. कर्नाटक राज्यात ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये तसेच सहकारी उपक्रम स्थापन करून त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा आणि ग्रामीण भागात आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ सन्मान प्रदान केला आहे.

संचालक डॉ. कुलकर्णी यांनी डॉ. कोरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. प्राचार्य डॉ. गंधे यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला, तर रजिस्ट्रार श्री. सपकाळ यांनी आभार मानले. या सत्कार सोहळ्यामुळे पीआयसीटी परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

See also  लोकसभेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे या मतदारसंघांवर लक्ष; शरद पवारांनी दिल्या विशेष सुचना