राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान लवकरच राबविणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

अवैद्य मद्य निर्मिती व विक्री तसेच बाहेर राज्यातील मद्य विक्री विरोधी मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवावी

महसूल वाढीसाठी देण्यात आलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे यासाठी नियोजन करावे

सोलापूर :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यात मागील तीन-चार महिन्यापासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे इतर मद्याच्या विक्रीत चांगली वाढ झालेली आहे. तरी राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून या अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित पुणे विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत श्री देसाई मार्गदर्शन करत होते. यावेळी उत्पादन शुल्क पुणे विभागाचे उपायुक्त मोहन वर्दे, राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक चरणजीत राजपूत (पुणे), प्रमोद सोनोने(नगर), नितीन धार्मिक (सोलापूर) यांच्यासह विभागातील उप अधीक्षक ही उपस्थित होते.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले की. पुणे विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी विभागातील सर्व गावांमध्ये हातभट्टी निर्मिती नष्ट करण्यासाठी काटेकोरपणे कारवाई करावी. शासन लवकरच हातभट्टी मुक्त गाव अभियान धोरण आणणार असून त्या अनुषंगाने एकाही गावात हातभट्टीची निर्मिती होणार नाही याची दक्षता घ्यावी. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी गावातील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले.
पुणे विभागाला व त्यातील प्रत्येक जिल्ह्याला विभागाच्या वतीने महसूल वाढीचे जे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे ते उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपल्या जिल्ह्यात कोठेही अवैद्य मद्य निर्मिती व विक्री होणार नाही. तसेच बाहेरील राज्यातील मद्य अवैद्यपणे येथे येणार नाही व आपल्या जिल्ह्यातून इतर राज्यात अशा पद्धतीने मद्य विक्रीसाठी जाणार नाही याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी, नियुक्त केलेल्या भरारी पथकांनी व चेक पोस्ट वरील पथकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी दिले.
उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सोयी सुविधा विभागाच्या वतीने देण्यात येतील. वाहन व इतर अद्यावत सर्व सोयी सुविधांची मागणी विहित पद्धतीने विभागाकडे त्वरित करावी. त्याप्रमाणेच आवश्यक असलेले मनुष्यबळ भरती प्रक्रिया सुरू असून पुढील सहा महिन्यात राज्यात सर्वत्र विभागाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना मंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
प्रारंभी पुणे विभागाचे उपायुक्त श्री. वर्दे यांनी विभागातील पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती पीपीटीद्वारे बैठकीत सादर केली.
पुणे विभागाच्या महसुलात मागील वर्षीपेक्षा यावर्षी १३ टक्के वाढ झालेली आहे, त्याप्रमाणेच गुन्हे अन्वेषणाचे प्रमाणात १५ टक्के वाढ झालेली आहे. तसेच हातभट्टी दारू विरुद्ध दिनांक १ एप्रिल ते २७ ऑगस्ट २०२३ पर्यंत २००४ गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ९७५, अहमदनगर ४०७ सोलापूर ५११ व विभागीय भरारी पथक १११ अशी गुन्ह्यांची संख्या असून महसूल जमा करण्याचे पुणे विभागाला दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

See also  ओबीसी विभागात तीन नवी महामंडळे