स्पर्धेत टिकण्यासाठी सजगतेने नवतंत्रज्ञानाचा अंगीकार गरजेचा
अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन; मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे ‘बदलते तंत्रज्ञान आणि आपण’वर व्याख्यान

पुणे : “माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यातही तितक्याच वेगाने बदल होत आहेत. जगण्याची पद्धत, नोकरी-व्यवसायाचे स्वरूप, जीवनशैली, आरोग्य अशा सर्वच गोष्टींवर संमिश्र परिणाम होताना आपण पाहत आहोत. गेल्या दहा वर्षात जेवढी प्रगती माणसाने केली आहे, ती माणसाच्या संपूर्ण आयुष्यात वेगाने घडलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल, तर सजगतेने नवतंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, प्रख्यात वक्ते व लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.

मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे ‘वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आणि त्याचे आपल्या व्यवसाय व आयुष्यावर होणारे परिणाम’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात अच्युत गोडबोले बोलत होते. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी साज हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण यांच्यासह उद्योजक व सभासद उपस्थित होते. तेजस्विनी पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. राजेश कुराडे आणि आकाश ढोणे यांनी प्रश्नोत्तरे संचालन केले. विनोद बांगर यांनी आभार मानले.

अच्युत गोडबोले म्हणाले, “आधी माहिती तंत्रज्ञान व्यवसायावर अवलंबून होते. आता व्यवसाय माहिती तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. आज अशी स्थिती आहे की, तंत्रज्ञानाचा वापर केला नाही, तर तुम्ही कालबाह्य होता. प्रवाहाच्या बाहेर फेकले जाता. रोज तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होत आहेत. कल्पनेतील उपकरणे आपल्या हातात आली आहेत. हातातील ही उपकरणे लवकरच गाड्या आणि शरीराचा अविभाज्य भाग होतील. कालांतराने मशीन एकमेकांशी कनेक्ट होतील. या सगळ्या गोष्टींच्या परिणामामुळे काही उद्योगधंदे येणाऱ्या काळात नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे व्यवसाय करण्याआधी येणाऱ्या पाच वर्षात त्याचे स्वरूप काय असेल, याचा विचार करा. पुढच्या ३०-४० वर्षात अनेक कार्यालयांना संग्रहालयात रूपांतरित करावे लागेल. त्याचा अनुभव आपण सर्वांनीच कोरोनाच्या काळात घेतला आहे. अनेक कंपन्या आजदेखील वर्क फ्रॉम होम या स्वरूपात सुरु आहेत.”

“तुम्हाला तंत्रज्ञानाचा पाया समजणे आणि तो पक्का असणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टींशी जोडून जगायचे असेल, तर तुमच्याकडे तंत्रकुशलता, संवादकौशल्य, व्यक्तिमत्व, टीमवर्क आणि नेतृत्वक्षमता असायला हवी. स्वतःच्या प्रगतीसोबत दुसऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे. देशात ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांना योग्य शिक्षण मिळत नाही. त्यांच्या शिक्षणासाठी आपण काम करावे. त्यातूनच आपण एक चांगला माणूस होऊ शकतो. आज जग कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वळत आहे. मात्र, कालांतराने याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, हे देखील ध्यानात घ्यायला हवे,” असेही अच्युत गोडबोले म्हणाले.

अरुण निम्हण म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणून एकमेकांना पूरक काम करण्याचा प्रयत्न असोसिएशन मार्फत सुरु आहे. यामध्ये उद्योजकांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाययोजना यासाठी एमईए नेहमीच विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे सत्र आयोजित करत असते. आज अच्युत गोडबोले यांनी तंत्रज्ञानात होणारे बदल व त्यांचा आपल्या व्यवसायावर होणारा परिणाम याविषयी सुंदर पद्धतीने महत्त्वाच्या मुद्द्यांसह स्पष्ट करून सांगितले. तांत्रिक आणि अवजड वाटणाऱ्या संकल्पना स्पष्ट करत असताना खूपच व्यवहारी उदाहरणांसह सरांनी त्याच्यामध्ये मनोरंजकता आणली होती. भविष्यातील व्यवसाय कशा स्वरूपाचे असावेत, याबद्दल खूप छान मार्गदर्शन मिळाले.”

See also  अदानी एअरपोर्ट देशातील इतर आणखी एअरपोर्ट मिळवण्यासाठी लावणार बोली.