श्रमप्रतिष्ठेचे विचार उद्योजकता विकासासाठी महत्त्वपूर्ण;
अमेरिकास्थित उद्योजक आशिष अचलेरकर यांचे विद्यार्थी साहाय्यक समितीमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पुणे : “श्रमप्रतिष्ठेचा विचार घेऊन कष्टाला प्रामाणिकतेची जोड दिली, तर यशस्वी उद्योजकतेचा प्रवास सुखकर होतो. उद्योजकतेची मानसिकता आपल्या मनात खोलवर रुजवायला हवी. त्यातूनच तरुण उद्योजक तयार होतील,”असे मत अमेरिकेतील ‘नीअर यु सर्व्हिसेस’चे संस्थापक आशिष अचलेरकर यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात उद्योजकता विकासावर आयोजित परिसंवादात अचलेरकर बोलत होते. प्रसंगी विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त मकरंद फडके आदी उपस्थित होते.

आशिष अचलेरकर म्हणाले, “उद्योग करायचा तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. मनात येणारे विचार प्रत्यक्षात उतरून सातत्याने कार्य केल्यास यश नक्कीच मिळते. उद्योगासाठी शिक्षणाची, वयाची अट नाही. केवळ इच्छाशक्ती आणि प्रखर मानसिकता असायला हवी. योग्य मार्गदर्शन, उद्योगाकडे पाहण्याची मानसिकता आणि मनापासून उद्योग वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न यातून कोणीही उद्योजक बनू शकतो. कोणतेही काम छोटे मोठे नसते. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे.”

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. शून्य भांडवल असूनही त्यांनी माणसे जोडून स्वराज्य निर्माण केले. मग आम्हाला साधा व्यवसाय करणे का शक्य नाही. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे. व्यवसाय करताना योग्य नियोजन, त्यामधील आवड, गुणवत्ता, वैशिष्ट्य यांची सांगड घालून व्यवसायामध्ये यशस्वी होता येते. व्यवसायामध्ये होणाऱ्या चुकांना स्वतःला जबाबदार धरून त्या योग्यवेळी सुधारणा करण्याची गरज आहे,” असेही अचलेरकर म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पटाडे याने केले. श्रेया मोरे हिने आभार मानले. तत्पूर्वी अचलेरकर यांनी समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन येथे भेट नव्याने बांधण्यात येत असलेल्या मुलींच्या वसतिगृह प्रकल्पाची पाहणी केली. समितीच्या कार्याची चित्रफीत पाहून माहिती घेतली. तुषार रंजनकर, तुकाराम गायवाकड यांनी समितीचे कार्य, भविष्यातील प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती दिली.

See also  बालभारती हा जीवनातील पहिला हस्तस्पर्श-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे