पाणी पुरवठा योजना कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या-अजित पवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन, हर घर जल योजना आणि नळजोडणी कामांचा आढावा घेतला. पाणी पुरवठा योजना यशस्वी होण्याच्यादृष्टीने कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, विजेअभावी योजना बंद पडण्याची समस्या दूर करण्यासाठी सौर ऊर्जेवर योजना राबवावी. ‘हर घर जल’ योजनेचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे. पाणी पुरवठा योजनेची कामे चांगल्या दर्जाची होतील व योजना बंद पडणार नाही याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कालबद्ध नियोजन करून योजना लवकर पूर्ण कराव्यात. पाणी वितरणासाठी पाईप चांगल्या दर्जाचे वापरावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी जिल्हा परिषदेकडील योजनांची आणि श्रीमती आवटे यांनी मजीप्राकडील योजनांची माहिती दिली.

See also  समाज कल्याण विभागामार्फत 'वॉक फॉर संविधान' चे उत्साहात आयोजन