६०० कर्मचाऱ्यांना घेऊन बाणेर मुख्य रस्त्यावर पुणे महानगरपालिका विविध विभागांची संयुक्त अतिक्रमण कारवाई

बाणेर : शनिवार दिनांक 14 रोजी बाणेर मुख्य रस्त्यावर पुणे महानगरपालिका तर्फे अनधिकृत बांधकामे व दुकानापुढे बांधण्यात आलेल्या शेडवर तसेच विद्युत खांबांवरील अनधिकृत केबलवर कारवाई करण्यात आले. एकूण 600 कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. सकाळपासूनच चालू असलेली ही कारवाई संध्याकाळी साडेसहा वाजता देखील चालू असल्याचे दिसून आले. पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभाग, पथविभाग ,विद्युत विभाग तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

पुणे शहरामध्ये बेस्ट 15 रस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे विकसित करण्यात येत आहे त्यामध्ये बाणेर रस्त्याची निवड करण्यात आली आहे याचेच काम सुरू करण्यासाठी रस्त्यावर अनधिकृत रित्या बांधण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर जेसीबी, गॅस कटर च्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.

बाणेर गावठाण हद्दीमध्ये या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. कोणत्याही पद्धतीने नोटीस न देता ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला . भारतीय जनता पक्षाचे ओबीसी राज्यसरचिटणीस प्रल्हाद सायकर तसेच स्थानिक नागरिकांनी जेसीबी समोर बसून या कारवाईस विरोध केला. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य मोजमाप करून ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळेस प्रल्हाद सायकर यांनी केली.

बाणेर प्रमुख रस्त्याला अतिक्रमण कारवाई चालू असताना काही ठिकाणी मात्र दुजाभाव केल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केला. सायकर चौकातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी शेजारील दुकानांवर कारवाई करण्यात आली परंतु त्या अधिकाऱ्याच्या बांधकामाला मात्र कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नाही असा आरोप नागरिकांनी केला तसेच बालेवाडी फाटा शेजारील एलिफंट हॉटेल शेजारील सर्व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली परंतु एलिफंट हॉटेलला मात्र अभय देण्यात आले असाच प्रकार इतर हॉटेल व्यवसायिकांच्या बाबतीत देखील होत असलेला दिसून आला.

पुणे महानगरपालिका विद्युत विभागामार्फत बाणेर मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबावरील 15000 मीटर अनधिकृत केबल काढून टाकण्यात आल्या तसेच यावेळी अनधिकृत रित्या केबल टाकत असलेल्या कामगारांच्या चार मशीन व दोन वाहने विद्युत विभागामार्फत जप्त करण्यात आले. परंतु ही कारवाई चालू असतानाच कर्मचाऱ्यांनी पुढे केबल कापल्यावर मागून लगेच इंटरनेट व्यवसायिक अनधिकृतरित्या आपली केबल पुन्हा त्याच खांबांवर टाकत असल्याचे दिसून आले.

See also  भारती विद्यापीठाचा २८वा वर्धापन दिन साजरा; शांतीलाल मुथा व जयसिंग पवार यांना 'जीवनसाधना' पुरस्कार प्रदान