राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २७: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर, प्रभारी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने, पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे माजी अध्यक्ष उमेश जावळीकर, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे, अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे विलास लेले आदी उपस्थित होते.

यावेळी पोस्ट कार्यालय, स्टेट बँक, जीवन विमा, महावितरण, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कृषी विभाग, इंडेन गॅस, भारत गॅस, प्रादेशिक परिवहन विभाग, वैध मापन शास्त्र, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, बीएसएनएल, पुणे महानगर परिवहन महामंडळ, २१२ पर्वती विधानसभा मतदार संघ, अन्न व औषध प्रशासन आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलद्वारे ग्राहक जागृतीचे संदेश देण्यात आले.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती होळकर म्हणाल्या, पुरवठा विभागाकडून शासनाच्या विविध धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकारांची महिती होण्यासाठी दर महिन्याला तालुकास्तरावर जनजागृती मोहिम राबविण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच ग्राहक मंचाला मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. झेंडे यांनी ई-कॉमर्स आणि डिजीटल व्यापाराच्या युगात फसवणुकीबाबत तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या सायबर गुन्हेविषयक संकेतस्थळावर तसेच ८८००००१९१५ या व्हॉटस्ॲपवर किंवा १९३० या क्रमांकावर संपर्क करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. जावळीकर म्हणाले, फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संघटित होणे खूप महत्त्वाचे आहे. ग्राहकांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्या २१ दिवसाच्या आत न्यायालयात येणे आणि न्यायालयात त्या ९० दिवसांच्या आत निकाली निघणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

श्री. लेले म्हणाले, ग्राहकांसाठी कायदे सक्षम असून ते ग्राहकांपर्यत पोहोचणे आवश्यक आहे. डिजीटल युगात सर्वसामान्य नागरिकांना कार्यपद्धतीची चांगली माहिती हवी. प्रास्ताविकात श्री. माने यांनी ग्राहक कायद्याची माहिती दिली.

See also  लोकन्यायालयाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थानी