ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्याकडून विद्यार्थी साहाय्यक समितीला पाच कोटीची देणगी

पुणे : एखादी व्यक्ती पन्नास वर्षे संस्थेचे प्रमुख म्हणून संबंधित राहते, त्या संस्थेत कुटुंबाप्रमाणे एकोप्याचे वातावरण तयार करते, संस्थापकाची ध्येय-धोरणे आणि तत्वे यांचे काटेकोर पालन करत संस्थेला एका उंचीवर नेते आणि एवढ्यावरच न थांबता वैयक्तिक देणगी देऊन संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावते, ही गोष्ट दुर्मिळ अशीच म्हणावी लागेल. ज्येष्ठ उद्योजक व विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी समितीला पाच कोटी रुपयांची देणगी देवून हा वस्तूपाठ घालून दिला आहे.

पवार यांनी देणगीचा धनादेश आणि सोबत एक पत्र लिहून विश्वस्त मंडळाला एक प्रस्ताव दिला आहे. “आपण सर्वजण, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून समिती प्रगतीचा एकेक टप्पा पुढे जात आहे. देणगीदार आणि हितचिंतकाच्या मनात समितीबद्दलचा विश्वास दृढ आहे. गेल्या दोन वर्षांपासून समितीचा उद्योजकता उपक्रम, पहिल्यांदाच पुण्याबाहेर सुरू होत असलेली वसतिगृहे, सेक्शन-८ कंपनी स्थापनेचा विचार अशा सर्वच प्रयत्नांतून समितीच्या कामाचा परीघ विस्तारतो आहे. याचा आनंद होत असतानाच माझे वैयक्तिक योगदान म्हणून ही देणगी समितीला देऊ इच्छितो. ही देणगी कॉर्पस फंडात ठेवून मिळणाऱ्या व्याजातील १५ टक्के रक्कम संस्थेने व्यवस्थापकीय खर्चासाठी वापरावी. ८५ टक्के रक्कम समितीच्या उद्दिष्टांसाठी प्राधान्याने खर्च करावी, त्यातून पैसे शिल्लक राहिल्यास समाजात अनेक गरजू लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था आहेत. त्यांना योग्य ती मदत करावी. यामुळे समितीचे काम मर्यादित न राहता व्यापक व्हावे आणि समाजाला त्याचा उपयोग व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी,” असे या पत्रात त्यांनी नोंदवले आहे.

आपण समाजाचे काही देणे लागतो, हा माझ्या आई-वडिलांकडून मिळालेला संस्कार मी आजवर आचरणात आणला आहे, त्याचाच हा एक भाग असल्याचे मी मानतो, असेही त्यांनी नमूद केले आहे. समितीच्या विश्वस्त सदस्यांनी कृतज्ञतापूर्वक या देणगीचा स्वीकार करून प्रतापरावांबद्दल आदर अजून दुणावत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

See also  पुणे लोकसभा मतदार संघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठकीचे आयोजन