महाविद्यालयांमध्ये समुपदेशकाचे पद निर्माण करणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

पुणे : अमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांनी दूर राहावे यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशकाचे एक अतिरिक्त पद (किमान व्हिजिटिंग) निर्माण करण्याचा शासन गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनने कार्टून्स कंबाईनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात पाटील बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शहरातील प्रथितयश व्यंगचित्रकारांनी ‘पुणेकरांनो, एकत्र येऊन अमली पर्दार्थांच्या विरोधात लढू या’ असा संदेश देणारी व्यंगचित्रे काढली.

पाटील म्हणाले, “अमली पदार्थांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि ते चिंताजनक आहे. परंतु 70 लाख लोकसंख्येचे शहर हे जवळजवळ कामातून गेले अशी प्रतिमा निर्माण होत आहे. त्यामुळे पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. येथे उद्योगांची संख्या मोठी असून, आरोग्य सेवा उत्तम आहेत. वेगाने विकसित होणारे देशातील आठव्या क्रमांकाचे शहर ही प्रतिमा जगातील व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेले  शहर अशी चुकीची होत आहे. त्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, नागरिकांना दक्षता पथकांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे, पब संदर्भात नियमावली करून अंमलबजावणीसाठी पुणेकरांनी एकत्र आले पाहिजे, या विषयात कोणीही विषयात राजकारण करू नये.”

निम्हण म्हणाले, “पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात अडकले असल्याचे चित्र निर्माण होत आहे. तरूण पीढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दीर्घकालीन, व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. आगामी काळात जनजागृती, समुपदेशन, पुनर्वसन, औषधोपचार आणि अमली पदार्थांना हद्दपार करणे असा हा पाच कलमी कार्यक्रम असणार आहे. या मोहीमेच्या बोधचिन्हाचे आज अनावरण करण्यात आले.”

चारूहास पंडित, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, धनराज गरड, शरयू फरकांडे, लहू काळे, अश्विनी राणे या व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला.

उमेश वाघ, अमित मुरकुटे, प्रमोद कांबळे, टिंकू दास, गणेश शिंदे, सचिन मानवतकर, गणेश शेलार, महेंद्र पवार यांनी संयोजन केले.

See also  वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहोचवावी – उद्योगमंत्री उदय सामंत