पुणे : मागील वर्षी पुण्यामध्ये पोर्शे कार अपघात प्रचंड गाजले होते आणि त्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधी सुद्धा कशा पद्धतीने गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात हे समोर आले होते. आताचे बीड मधले संतोष देशमुख हत्या प्रकरण हे राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधितच पदाधिकारी गुंतलेले आहेत. त्यानिमित्ताने भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे आणि खंडणी, अपहरण, खून ते महिलांची निंदा नालस्ती असे सर्वच प्रकार दिसून आले आहेत. शिवाय तब्बल 22 दिवस पोलीस आणि सीआयडीला यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा सापडला नव्हता. तो आता स्वतःहून हजर झालाय. मात्र त्याची माहिती त्याच्या समर्थकांना होती. यासर्वात मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे यांच्याकडे संशयाचा इशारा त्यांच्याच आघाडी पक्षातील आमदार धस करत आहेत.
संशयित आरोपी वाल्मीक कराडला पकडण्याच्या ऐवजी त्याची मालमत्ता ताब्यात घेण्याची मोहीम सीबीआय राबवत होती. याच्याने गुंडगिरीला कसा आळा घातला जाईल हेही आता गृहमंत्री फडवणीस यांनी जनतेला सांगायला हवे. 22 दिवस हा संशयित सापडत नाही याचा अर्थ काय? तो स्वतःच हजर झाल्यावर त्याची तब्येत बिघडते आणि त्याला औषधोपचार सुरू होतात. हा सर्वच घटनाक्रम गृहखात्याच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
परभणी आणि त्यानंतर आता बीड मधील घटना या प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी कुठल्या स्तरावर गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात हे अधोरेखित करते. सामान्य माणसाला कोणीही वाली राहिला नाही अशी भावना आज सर्वच मराठी माणसाच्या मनात निर्माण झालेली आहे. गेले काही वर्षे गृह खात्यावर सातत्याने ठपका ठेवला जात असतानाही फडणवीस हे ते खाते स्वतःकडे ठेवण्यात आग्रही आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतःला चाणक्य म्हणून घेत असले तरी ते गृह खाते सांभाळण्यामध्ये मात्र अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करण्यासाठी त्यांनी गृह खाते सोडावे व सक्षम व्यक्तीकडे हे खाते द्यावे अशी मागणी करीत आहोत असे मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आम आदमी पार्टी यांनी सांगितले.






















