महिलांना रोजगार प्रशिक्षण; ‘डीआरडीए’चा अमेरिकन इंडियन फाउंडेशनबरोबर सामंजस्य करार

पुणे, दि. 30: जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना वेतनी रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) आणि अमेरिकन इंडियन फाउंडेशन संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला.

जिल्हा परिषदेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आणि अमेरिकन इंडियन फाउंडेशनच्या प्रकल्प प्रमुख बंदना रॉय यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी डीआरडीएच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू, अमेरिकन इंडियन फाउंडेशनच्या पुणे जिल्हा प्रकल्प प्रमुख तृप्ती कुचेरिया व ‘डीआरडीए’तील जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.

या करारानुसार मावळ तालुक्यातील उर्से, सांगवडे व चांदखेड या तीन गावात पुढील ३ वर्षात अमेरिकन इंडियन फाउंडेशनमार्फत शिवणकाम, मल्टी लेयर फार्मिंग, आयटी स्किल्स, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, मार्केटिंग आदीबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर महिलांना रोजगाराच्या संधी संस्थेमार्फत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच स्वयंरोजगार करण्यास इच्छुक महिलांनाही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उमेद अभियानाअंतर्गत महिला या उपक्रमाचे लक्ष्य घटक असणार आहे.

या उपक्रमातील सर्व आर्थिक बाबी या अमेरिकन इंडियन फाउंडेशन संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून या उपक्रमातील कोणत्याही आर्थिक बाबींवर खर्च केला जाणार नाही, अशी माहिती श्रीमती कडू यांनी दिली आहे.

See also  जागतिक स्नुकर अजिंक्यपद २०२४ स्पर्धेत पुण्यातील आरव संचेती याची निवड !!