पुणेकरांच्या हक्काच्या कॅन्सर हॉस्पिटलसाठी महायुती सरकारला दिला नोटांचा हार -माजी आमदार मोहन जोशी

पुणे – पुणेकरांच्या हक्काची मंगळवार पेठेतील कॅन्सर रुग्णालयासाठीची जागा खासगी बिल्डरला देण्याचा रस्ते विकास महामंडळाचा निर्णय हा महायुतीचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार आहे, या भ्रष्ट सरकारला नोटांचा हार पाठवून काँग्रेस पक्षातर्फे निषेध नोंदविण्यात आला, असे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (सोमवारी) प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.

या निर्णयाच्या निषेधार्थ मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रस्ते महामंडळाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले आणि भ्रष्ट युती सरकारसाठी नोटांचा हार अधिकाऱ्यांना घालण्यात आला. यावेळी आंदोलन करण्यात आले. ‘पुणेकरांच्या हक्काचे कॅन्सर हॉस्पिटल लाटणाऱ्या मिंधे सरकारचा धिक्कार असो, ‘खाऊन खाऊन खोके, माजलेत बोके’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

ससून रुग्णालयासमोरील मोक्याची प्रशस्त जागा रस्ते विकास महामंडळाने निधी उभारणीच्या नांवाखाली कवडीमोल दराने खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. केवळ ७०-८oकोटी रुपयांच्या बदल्यात तब्बल ९० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर जागा दिली जात आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण खात्याचे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न भंग पावणार आहे, असे मोहन जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून हा भ्रष्टाचार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ससून रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी मंगळवार पेठेतील रस्ते विकास महामंडळाच्या जागेत कॅंन्सर हॉस्पिटल उभारण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्या संदर्भात ससून रूग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली. महामंडळाचा तोटा राज्य सरकार भरून काढेल असेही ठरले होते. त्यानुसार सन २०१३ मध्ये महगमंडळाने वैद्यकीय शिक्षण खात्याला जागा देण्यास हरकत नसल्याचे कळविले. त्यावर पुढे कार्यवाहीच झाली नाही. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात रस्ते महामंडळाच्या मंगळवार पेठेतील जागेवर कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळे हॉस्पिटल होईल, अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, खाजगी बिल्डरला जागा देण्याचा घाट घातला गेला यामागे कोट्यावधींचा भ्रष्टाचार आहे. पुणेकरांना हक्काचे कॅन्सर हॉस्पिटल मिळावे यासाठी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.

या आंदोलनात चंद्रशेखर कपोते, रोहन सुरवसे पाटील, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, आयुब पठाण, यशराज पारखी, अनिकेत सोनावणे, स्वाती शिंदे, अंजली सोलापुरे, अनिता मकवाना, अनिता धिमधिमे, ॲड.मोनिका खलाणे, उमेश काची, रफिक शेख, कृष्णा साठे ज्ञानेश्वर जाधव, भावेश मकवाना आदी सहभागी झाले होते.

See also  राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान