देश विश्वगगुरु झाला पाहिजे या विचाराने भाजपचे काम : नितीन गडकरी

पुणे : कोणाला आमदार खासदार करण्यासाठी नाही तर भारतीय जनता पक्ष हा देश विश्वगगुरु झाला पाहिजे या विचाराने काम करतो आहे,असे केंद्रीय परिवहन आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे सांगितले.‌

महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. खासदार मेदा कुलकर्णी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर तसेच पुनित जोशी, वर्षा डहाळे डॉ. संदीप बुटाला, मोनिका मोहोळ, जयंत भावे, किरण साळी, सचिन थोरात, मंदार जोशी आदी कार्यकर्ते व्यासपीठावर होते.

देशाच्या प्रगतीसाठी पैशांची गरज नसते तर इमानदारीने काम करणाऱ्यांची गरज असते. त्यासाठी डबल इंजिन सरकार राज्यामध्ये आले पाहिजे. प्रश्न सोडवणारे नेते म्हणून उच्चांक मोडणाऱ्या मतांनी चंद्रकांत पाटील यांनी निवडून येतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गडकरी म्हणाले की गरीबी हटाव अशी घोषणा झाली, पण गरीबी कोणाची हटली नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हे नवीन आर्थिक धोरणामुळे लोकप्रिय झाले आहे.‌ देशात परिवर्तन सुरू झाले आहे संशोधन आणि शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे या प्रयत्नांसाठी जनतेच्या पाठबळाचे अपेक्षा असते ती निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी पूर्ण केली पाहिजे.

आम्ही संविधान बदलणार नाही. ते बदलण्याची कोणाची हिंमत नाही. संविधानातील मुलभूत तत्वे बदलता येत नाही ज्यांनी पूर्वी संविधान तोडण्याचे काम केले तीच काँग्रेस आता आम्ही संविधान सोडत आहोत असा अपप्रचार करत आहे,अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले ” ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करणारी आहे. काँग्रेसच्या काळामध्ये लाखो करोड रुपयांची गुंतवणूक वाया गेली. सिंचन सुविधा नव्हत्या, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होते. पाण्याच्या नियोजनाकडे लक्ष दिले गेले नाही .‌ १९७० पासून २३ राज्यांची आपापसात पाण्यावरून भांडणे होती. त्यातली १७ भांडणे मी त्यांच्यात मध्यस्थी करून मिटवली
पाकिस्तान मध्ये जाणारे नद्यांचे पाणी आज पंजाब हरियाणाला मिळते आहे. त्यामुळे त्यांच्यातला पाण्याचा प्रश्न सुटला.”

पूर्वी पुणे शहर स्वच्छ हवा असलेले आणि सुंदर होते. आता पुण्यात प्रदूषण खूप झाले आहे. त्याबद्दल एक लाख कोटींची कामे झाल्याशिवाय राहणार नाहीत. बस हाॅस्टेस आणि खानपान सुविधा असलेली बस पुण्यातही सुरू केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

समाजात जातीय तिथे विष पेरले जात आहे त्याला काही अर्थ नाही.  वेगवेगळ्या उपासना पद्धती आहेत पण संस्कृती एकच आहे, असे सांगून गडकरी यांनी वेस्ट टु वेल्थ आदी कल्पनांचा उहापोह केला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हजारो कोटींची कोटींची रस्त्यांचीकामे मंजूर केली. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे पेक्षा मोठा ८०० किलोमीटरचा ५५ हजार कोटीचा रस्ता मंजूर केला.‌ पुणे ते औरंगाबाद दोन तासात पोहोचू शकू असा रस्ता तयार केला, असे त्यांनी नमूद केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की विकास विषयावर पुढची पाच वर्षे केंद्रातील सरकार काम करणार आहे. मध्यमवर्गीयांचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे मेट्रो, अटल सेतू, विमानतळ अशी अनेक कामे पुण्यात झाली दारिद्रय रेषेवर २५ कोटी लोकांना आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

See also  चित्रकार समाजाला दिशा देणारा असावा : विवेक खटावकर