सिंहगडावर रंगणार भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा

खडकवासला :  महाराष्ट्र पर्यटन विभाग व सिम्पल स्टेप्स फिटनेस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड किल्ल्यावर भारतातली पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा 13 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर सिंहगड चढून सर करायची आहे. त्यामुळे स्पर्धकांना लागोपाठ 16 वेळा सिंहगड सर करावा लागेल. पूर्ण एव्हरेस्टिंग (सोळा वेळा) व अर्ध एव्हरेस्टिंग (आठ वेळा) अशा दोन विभागात  स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धक स्वतंत्र रीतीने अथवा टीम करून देखील सहभागी होऊ शकतात. नवोदितांसाठी यामध्ये फन रन  आणि वॉक हा पर्याय देखील उपलब्ध आहे. या पर्यायात स्पर्धक पौर्णिमेच्या रात्री म्हणजे 14 डिसेंबरला एकदा सिंहगड सर करतील.

सर्व स्पर्धक घाट रस्त्याने सिंहगड सर करणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या कालावधीत सिंहगड घाट रस्ता वाहतुकीसाठी  (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता) पूर्णपणे बंद असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.  महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरचे अनेक स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. सिम्पल स्टेप्सच्या वतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांना टी-शर्ट व गुडी बॅग देण्यात येईल. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी सर्व सहभागींना रूट सपोर्ट स्पर्धा कालावधीत जेवण व वैद्यकीय सेवा याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.  स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व यशस्वी स्पर्धकांना मेडल देण्यात येईल. पतंजली आत्मबोध वेलनेस सेंटर हा स्पर्धेचा बेस कॅम्प व स्टार्ट पॉइंट असणार आहे. यानिमित्त या केंद्रातर्फे आरोग्य विषयक कार्यशाळा स्पर्धकांसाठी घेतल्या जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या स्पर्धेची माहिती देण्याकरिता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र पर्यटन पुणे विभागाच्या उपसंचालक श्रीमती शमा पवार ,  उपवनसंरक्षक दीपक पवार, सिंपल स्टेप्स चे संस्थापक  आशिष कासोदेकर उपस्थित होते. त्याचबरोबर सिंहगड परिवार संस्थेचे ऍड. प्रकाश केदारी, वेस्टन घाट रनिंग फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे  आवर्जून उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी लिंक खालील प्रमाणे – https://www.townscript.com/e/simple-steps-everesting-pune

See also  ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन