पुणे: भारतीय टेनिकाईट महासंघाच्या ‘चीफ पेट्रॉन’पदी माजी आमदार मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाची वार्षिक सभा नुकतीच झाली. या सभेत एकमताने मोहन जोशी यांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला.
टेनिकाईट(रिंग टेनिस) या क्रीडा प्रकाराला उत्तेजन देण्यासाठी तुम्ही निष्ठेने प्रयत्न करीत आहात. तुमचे मार्गदर्शन आणि पाठिंब्याने टेनिकाईट च्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, अशा शब्दांत मोहन जोशी यांचा महासंघाने गौरव केला आहे. भारतीय टेनिकाईट महासंघाचे अध्यक्ष राजीव शर्मा आणि सेक्रेटरी जनरल एम.आर.दिनेशकुमार यांनी नियुक्तीचे पत्र मोहन जोशी यांना दिले आहे.
टेनिकाईट क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात मोहन जोशी यांचा पुढाकार राहिला आहे. टेनिकाईट (रिंग टेनिस) महाराष्ट्र संघटनेचे मोहन जोशी अध्यक्ष आहेत. हा खेळ अधिक लोकप्रिय व्हावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित करून खेळाडूंच्या कौशल्याला अधिक वाव देण्याचा प्रयत्न करू, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.