पुलंचे बहुआयामी विचार युवा पिढीला प्रेरक : सतीश आळेकर
ग्लोबल पुलोत्सवाला रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरुवात

पुणे : जगातील संवेदनांचा अभ्यास करत समाजाविषयी विचार करणारे चिंतनशील भाष्यकार, साहित्यिक तसेच राजकारणावर परखडपणे भाष्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे होय. पुलं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरील महत्त्वाचे घटक आहेत. या महनीय व्यक्तिमत्त्वाची छाया त्यांच्या आठवणींमधून, विचारांमधून की त्यांनी केलेल्या प्रेरणादायक कार्यामधून शोधायची हा निकडीचा प्रश्न आहे. पुलंचे बहुआयामी विचार युवा पिढीला प्रेरक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केली.

कोहिनूर गु्रप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्स आयोजित ग्लोबल पुलोत्सवाचे उद्घाटन आज (दि. 6) सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी पुलंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर रेखाटलेल्या व्यंगचित्राचे अनावरण करून पुलोत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. पुलोत्सवाचे स्वागताध्यक्ष, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्सचे अजित गाडगीळ, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, कार्टूनिस्ट कंबाईनचे माजी अध्यक्ष, व्यंगचित्रकार चारुहास पंडित मंचावर होते. बालगंधर्व कलादालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्टूनिस्ट कंबाईनच्या वतीने पुलंना मानवंदना देण्यासाठी पुलोत्सवादरम्यान बालगंधर्व कलादालनात पुलंच्या साहित्यवरील व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 या वेळात सर्वांसाठी खुले आहे. पुलंच्या पंच्चाहत्तरीनिमित्ताने तयार झालेला, 1994 साली प्रदर्शित झालेला, त्यांच्या बहरूपी कारकिर्दीवरील दर्मिळ लघुपट ‌‘या सम हा‌’ या वेळी दाखविण्यात आला. सुधीर मोघे, मुक्ता राज्याध्यक्ष यांचे दिग्दर्शक आहेत.

आधुनिक संवेदनांशी नाळ जुळवावी..
सतीश आळेकर पुढे म्हणाले, आपल्यापेक्षा वेगळ्या संवेदनांवर भाष्य करणाऱ्या लेखक, साहित्यिकांचे, त्यांच्या नववाङ्मयाचे स्वागत करणारे, प्रस्थापितांविरोधात विचार मांडणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी निर्माण केलेला करमणुकीचा दर्जा त्यांनी स्वत:चा एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. लेखक, नाटककार, रंगकर्मी म्हणून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाविषयी अनेक आठवणी आळेकर यांनी या प्रसंगी जागविल्या.
पुलंचा विनोद निर्विष..
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, पुलं हे नावच रसिकांच्या मनात आनंदाचे कारंजे निर्माण करते. पुलंनी साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत या विषयांमध्ये आनंद घेतला तसेच रसिकांनाही दिला. महाराष्ट्राच्या वर्तमानात पुलंची आठवण नाही असा एकही दिवस नाही. त्यांचे भाषेवर असलेले प्रभुत्व, साहित्यकृतीतून मांडलेले उपहास, विडंबन, सहजता, तारतम्य हे समाजाचे भावनिक आरोग्य उत्तम ठेवणारे आहे. आजच्या काळात खिलाडू वृत्ती हरवलेल्या समाजात विनोद बहरू शकत नाही. खिलाडू वृत्ती हरवणे ही समाजाचे भावनिक आरोग्य धोक्यात असल्याची सूचना असते. पुलंचा विनोद निर्विष होता. जखमा करण्यापेक्षा विसंगतीवर बोट ठेवणे हाच त्यांच्या विनोदाचा उद्देश होता. आज विनोद अतिदक्षता विभागात आहे त्याला समाजच जबाबदार आहे. चांगला विनोद निर्माण झाला तरी तो पचवण्याची शक्ती समाजात उरलेली नाही. पोटदुखीचा त्रास असलेल्या कलाविश्वाला त्यांनी दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचे मुक्तकंठाने कौतुक करायला शिकविले.
.. ते कृतज्ञ भावनेने केलेले पुलंचे स्मरण ठरेल
प्रा. जोशी पुढे म्हणाले, बाबा आमटे यांच्या आनंदवनापासून अनिल अवचट यांच्या मुक्तांगणपर्यंत अनेक संस्थांशी पुलं जोडलेले होते. पण आजचे मराठी लेखक आत्ममग्न आहेत. सामाजिक काम करणाऱ्या संस्था आणि चळवळी यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी त्यांना आस्था वाटत नाही. कोणताही आकांतांडव, गाजावाजा न करता ठाम भूमिका घेता येते हे पुलंनी दाखवून दिले. त्यांनी त्यांच्या काळातील नव्या प्रतिभावंतांचे मनापासून स्वागत केले. पु. ल. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती वृत्ती आहे. या जगातले दुःख नाहीसे करता येत नाही पण ते हलके करण्याची आस या वृत्तीत होती. तिला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. त्यांना उत्तम, उदात्त, उन्नत अशा सर्वोत्तमाचा ध्यास होता. स्वतः आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांनी स्वतःसाठी काही साठवले नाही उलट समाजाकडून घेतलेले समाजालाच वाटून टाकले. त्यांची ही पुलकित जीवनवृत्ती अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर ते पुलंचे कृतज्ञ भावनेने केलेले खरे स्मरण ठरेल.

See also  बाणेर मध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा


पुलं मराठी जनतेच्या मनात कोरलेले नाव..
कृष्णकुमार गोयल म्हणाले, पु. ल. देशपांडे हे मराठी जनतेच्या मनात कोरलेले नाव आहे. त्यांनी संस्कारांची, प्रेरणेची मुद्रा प्रस्थापित केली. या महोत्सवाच्या माध्यमातून कलेचा जागर होत असून अनेक गुणांनी संपन्न असलेल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पुढील पिढीला होणार आहे, जी प्रत्येकालाच मार्गदर्शक ठरेल. सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर घालणारा हा उत्सव प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करेल.

चारुहास पंडित म्हणाले, शब्दातून अर्कचित्र निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आम्ही अर्कचित्रकारांनी मानवंदना दिली आहे. पुलंचे गारूड पिढ्यान्‌‍पिढ्या समाजमनावर राज्य करेल.

स्वागतपर प्रास्ताविकात वीरेंद्र चित्राव म्हणाले, पुलं ही नुसती मुद्रा नव्हे तर ते संस्कार आहेत. पुलंनी मराठी माणसाच्या मनात रसिकता प्रवाहित ठेवली आहे. पुलंचा सहज वावर असणाऱ्या चित्रपट, नाटक, संगीत, साहित्यकलेचा जागर पुलोत्सवाच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे. भविष्यात पुलोत्सव महाराष्ट्राच्या विविध भागात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.मान्यवरांचे स्वागत सतीश जकातदार यांनी केले. व्यंगचित्रकार विश्वास सूर्यवंशी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.