पुणे : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत २०२४-२५ वर्षीच्या कामकाजांचा आणि सन २०२५-२६ या वर्षांत करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी श्री. डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, मागील आर्थिक वर्षात सर्व यंत्रनांनी नियोजनबद्ध काम केल्यामुळे शंभर टक्के खर्चाचा उद्दिष्ट साध्य झाले, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सुरू असलेली कामे ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करायची असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कामांसाठी ३१ मे २०२५ पर्यंत सर्व मान्यतांची प्रक्रिया पूर्ण करुन, ही कामे डिसेंबर २०२५ पर्यंत कामाची गुणवत्ता राखून पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणाना दिल्या. डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२६ या तीन महिन्यात करायची आहे. काही कामांची तपासणी करण्यात येईल. नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत प्रत्येक विभागाने एक प्रस्ताव नियोजन विभागास सादर करावा यात नाविन्यपूर्ण कामांचा समावेश असावा असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री. पाटील म्हणाले, जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्रलंबित कामांचे आदेश ३१ मे २०२५ पूर्वी देऊन कामे तात्काळ पूर्ण करावीत. बैठकीला संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.