अभियांत्रिकी ही केवळ यंत्रांची नव्हे, तर माणसांच्या समस्या सोडवण्याची कला आहे!— प्रा. मिलिंद जोशी

पुणे :  भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ प्रेरणादायी आणि भावूक वातावरणात पार पडला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते नामवंत लेखक, प्रसिद्ध वक्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. मिलिंद जोशी यांचे विचारप्रवण भाषण.

मा. प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, “अभियांत्रिकी ही केवळ यंत्रांची नव्हे, तर माणसांच्या समस्या सोडवण्याची कला आहे.” त्यांनी विद्यार्थिनींना समाजाभिमुख विचार करण्याचा आणि मानवी गरजांवर लक्ष केंद्रीत करत नवोन्मेष करण्याचा सल्ला दिला. मूल्यांशी निष्ठावान राहून जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव होते. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थिनींना सतत शिकत राहण्याचा सल्ला दिला आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून उत्तम अभियंते बनण्याचे आवाहन केले.

विद्यार्थिनींनी उपस्थित पाहुण्यांशी थेट संवाद साधला, ज्यात प्रा. मिलिंद जोशींनी आपले अनुभव, प्रेरक किस्से आणि विचार स्पष्टपणे मांडले. या कार्यक्रमात नृत्य, गायन, अभिनय, आणि कविता सादरीकरण करण्यात आले यामुळे संपूर्ण वातावरण उत्साही आणि आनंददायी झाले.

उपप्राचार्य प्रा. डॉ. अविनाश पवार, उपप्राचार्या प्रा. डॉ. सुवर्णा चोरगे, तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी समन्वयन प्रा. किरण येसुगडे, प्रा. नेहा बोन्सले, प्रा. सोनल पाटील आणि प्रा. यशोमती धुमाळ यांनी केले. त्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वी झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी निरोप देताना सर्वांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या आठवणी, शिकवणूक आणि मूल्यांची शिदोरी घेऊन विद्यार्थीनींनी एका नव्या प्रवासाकडे पाऊल ठेवत आहेत.

See also  केंद्रीय तपास यंत्रणांना सुप्रीम कोर्टाची चपराक; आम आदमी चा विजय