सत्तेसाठी “भाजपबरोबर जाऊन बसायचं” ही भूमिका कोणी मांडत असेल, तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. -शरद पवार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची खुद्द शरद पवार यांनी बैठक घेत पक्ष दमदार कमबॅक करणार असल्याचे संकेत यावेळी कार्यकर्त्यांना दिले.

पिंपरी चिंचवड शहराच्या पक्षाच्या कामकाजाचा आढावा संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, श्री. प्रकाश म्हस्के, राहुल कलाटे, सुलक्षणा शीलवंत, शहराचे अध्यक्ष तुषार कामटे, सरचिटणीस जयंत शिंदे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे सहकारी सुनील गव्हाणे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार शरद पवार म्हणाले,  पिंपरी-चिंचवडच्या आजूबाजूला कारखानदारीचं जाळं उभं करण्यासंबंधीचं काम आपण लोकांनी केलं. त्याच्या पाठीमागे एक विकासाचा दृष्टिकोन होता. हे शहर वाढलं, शहराचं चित्र बदललं. पण इथलं समाजकारण, राजकारण यामध्ये अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. अनेक वर्ष हा सगळा परिसर तुमच्या- माझ्या विचारांच्या लोकांचा परिसर होता. त्याचं नेतृत्व मगाशी मी सांगितलं अण्णासाहेब मगर यांनी केलं, डॉ. घारे यांनी केलं. नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं. नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण मोरे आणि काही सहकाऱ्यांनी लक्ष घातलं असे अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्यांनी या शहराचा चेहरा हा बदलण्यासाठी कष्ट केले आणि इथला विकास करण्याबद्दलची काळजी घेतली. याच्यामागे गांधी- नेहरूंचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा होता. जो काँग्रेसच्या विचारधारेचा होता. त्या विचाराने काम या ठिकाणी झालं. आज हीच विकासाची गाडी आपल्याला गतीने पुढे न्यायची आहे.

आज अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. आज या शहरांमध्ये २४ तास पाणी ही लोकांची मागणी आहे. त्यासंबंधीतही लक्ष घातलं पाहिजे. आज या शहराच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामं झाली. नाईलाजाने निवाऱ्याची सोय नाही, पर्यायी व्यवस्था नाही म्हणून गुंठेबाजी झाली आणि त्या गुंठेवारीतून छोटी मोठी घरं ही बांधून आपल्या आयुष्यात निवारा हा निर्माण करण्याचा प्रयोग काही लोकांनी या ठिकाणी केला. आज ही बांधकामे कायम करण्याबद्दलची भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. नवीन होऊ देऊ नका, पण जे आहेत ती वास्तू टिकली पाहिजे. तो निवारा उध्वस्त करून चालणार नाही. एक अत्यंत महत्त्वाचा तो रेड झोनचा प्रश्न आहे. रेड झोनच्या प्रश्नासाठी सुद्धा मला आठवतंय की, आम्ही लोकांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष घातलं. काही प्रश्न सोडवले, त्यातील क्षेत्र कमी- जास्त केलं. पण अजूनही तो प्रश्न काही प्रमाणात शिल्लक आहे. त्याच्याबद्दल लक्ष घालण्याची गरज आहे. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ज्याचा उल्लेख डॉ. कोल्हे यांनी केला “नदी सुधार योजना”. मी अनेकदा जातो अधून- मधून. कधी हेलिकॉप्टरने जातो, कधी रस्त्याने जातो. नदी बघितल्यानंतर पांढरा फेस त्यातून जातोय, हे चित्र बघायला मिळतं. याचा अर्थ सबंध पाणी हे शुद्ध राहिलं नाही. त्याचा परिणाम आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो, ही अतिशय चिंताजनक स्थिती आहे. असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आहेत. हे प्रश्न सोडवायचे असतील तर एका विचाराने काम करणारे संघटन याची आवश्यकता आहे. हे संघटन फक्त ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ देऊ शकतो. त्यासाठीच आपल्याला यातल्या कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे.

See also  पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या--महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

उद्या महानगरपालिकेची निवडणूक आली. निवडणुका येतात जातात. पण त्या निवडणुकीचा परिणाम दोन गोष्टीत आपण लक्ष द्यायला लागेल. एक नवीन नेतृत्वाची फळी ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळी मधून विकासाच्या संबंधीचं कामकाज उभं करणं, याच्यात आज या ठिकाणी लक्ष घालावं लागेल. नगरपालिका, महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारांमध्ये व गांधी- नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांमध्ये होती. मध्यंतरी काहीतरी गडबड झाली आणि भाजपाची सत्ता या ठिकाणी आली. मी त्याबद्दल जास्त काही खोलात बोलू इच्छित नाही. पण आज हे चित्र आपल्याला बदलायचंय. हे बदलायच्या साठी कारण विकासाच्या कामांना गती द्यायची आहे. या नगरीचा लौकिक कायम ठेवायचा आहे. नागरिकांचे रास्त प्रश्न सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारची प्रेरणा मिळेल, अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आहे. ते करायचं असेल तर संघटन मजबूत असलं पाहिजे. चढ- उतार बरेच झाले. काही लोक गेले, नवीन काही लोक येत आहेत. गेलेत त्यांची चिंता करू नका, अनेक नवीन लोक येत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी मला पाहायला मिळाले आहेत.

खासदार शरद पवार म्हणाले, कोण आला? कोण गेला? याची काहीच चिंता करू नका. लोक फार शहाणे आहेत. या देशाची लोकशाही जी टिकली आहे, ती आमच्यासारख्या नेत्यांमुळे नाही. ही लोकशाही टिकली ती सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणातून! त्यांच्या एकीतून आज ही टिकली आहे. त्यामुळे सामुदायिक माणसांचं शहाणपण याचं सन्मान करणं व त्याच्याबरोबर उभं राहणं, हे काम तुम्हाला- मला सगळ्यांना करावं लागेल. आज अनेकजण वेगवेगळ्या विचारांचे आहेत. आत्ताच कुणीतरी भाषण करताना सांगितलं की, तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असण्याचं कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार. फुले- शाहू- आंबेडकर यांचा विचार. हा जर सगळे मानत असतील तर ते सगळे मला मंजूर आहेत. पण सत्तेसाठी “भाजपबरोबर जाऊन बसायचं” ही भूमिका कोणी मांडत असेल, तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. त्या दृष्टिकोनातून पावलं ही आपल्याला टाकायची आहेत.

See also  दहशतवाद्यांनी हिंदूंना नव्हे भारतीयांना मारले : राहुल डंबाळे; नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी तर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्या विरोधात कॅण्डल मार्च व निषेध सभा

तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका. इथं आपण सगळ्या जागा लढू. आपल्याबरोबर कोणी येत असेल विचारांनी, कार्यक्रमांनी, पिंपरी- चिंचवडच्या हिताचे रक्षक करण्याच्या भूमिकेने जे कुणी येत असतील. त्यांच्याशी नेतेमंडळी विचारविनिमय करतील. शेवटी जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक नवीन नेतृत्व प्रत्येक वॉर्डात कसं तयार होईल? याची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो, उद्याची महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही चिंताच करू नका. आपण सगळ्या नव्या पिढीला उभं करू, भगिनींना याच्यामध्ये जास्त संधी घेऊ. पुन्हा एकदा या ठिकाणी विचार आणि काम करणाऱ्यांच्या हातामध्ये हे शहर आहे, ही स्थिती निर्माण करू. मध्यंतरी या भागाच्या शहराच्या ज्यांनी वाटण्या केल्या. नदीच्या पलीकडे, नदीच्या अलीकडे आणि रस्त्याच्या पलीकडे, रस्त्याच्या अलीकडे! हा नवीन व्यवसाय राजकारणात सुरू झालेला आपण जो इथे पाहिला, हे सगळं वातावरण स्वच्छ करायचं आहे. जसं नदी सुधार योजना त्याचा खराब फेस घालवून तिथलं पाणी स्वच्छ होईल. तसंच इथं नेतृत्वाचं सुद्धा एकंदरीत चित्र हे स्वच्छ करायचं आहे. ते करण्यासाठी तुम्ही मी सगळेजण कष्ट करू, हीच खात्री मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो.

मी तुम्हाला एक विश्वास देतो की, याच्यात अधिक लक्ष घालण्याचं काम मी स्वतः आणि बाकीचे सगळे सहकारी करतील. तुम्हाला पोरकं करणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीतून आपण पुन्हा एकदा हा पक्ष या ठिकाणी बांधू शकू असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक माजी जुने जाणते कार्यकर्ते तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.