शहरांमध्ये ‘डक्ट पॉलिसी’ शासनाने सक्तीची करावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई : उत्तम दर्जाची आणि सुरक्षित इंटरनेट सेवा द्यायची असेल, तर शासनाने ‘डक्ट पॉलिसी ‘ सक्तीची केली पाहिजे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडली.

याविषयी बोलताना आमदार शिरोळे यांनी सांगितले पुणे शहरात नांदेड सिटी कडून  येताना अचानक तुटलेली केबल दुचाकीस्वाराच्या मानेला घासून अपघात झाला. शहरातील बहुतांश रस्त्यांवर अनधिकृतपणे इंटरनेट आणि केबल टीव्हीसाठी च्या केबल टाकण्यात आल्या आहेत, या केबल कशाही पसरल्या असल्याने शहराचा चेहराही विद्रुप झालेला आहे. तसेच वारा आणि पाऊस झाला तर या केबल तुटण्याची शक्यता असते जेणेकरून नागरिकांना एक मोठा धोका निर्माण झाला आहे. 

महापालिका प्रशासनाने २०१८ मध्ये  डक्ट पॉलिसीला मंजुरी दिली होती पण अमलात आणली नाही. महापालिकेकडून भूमिगत केबल टाकण्याकरिता खासगी इंटरनेट  कंपन्यांकडून १२०००/-₹ प्रति रनिंग मीटर असे शुल्क घेतले जाते. हे शुल्क टाळण्याकरिता खासगी कंपन्या ओव्हरहेड केबल्स टाकून सुविधा पुरवितात. हे शुल्क जास्त असून त्या बद्दल फेरविचार होणे आवश्यक आहे, असे आमदार शिरोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

शहरात डक्टिंग झाल्यास इलेक्ट्रिक केबल्स, सीसीटीव्ही वगैरे यंत्रणेच्या केबल्स त्यातून टाकता येतील. त्यामुळे शहरांचे विद्रुपीकरण थांबेल आणि अपघाताचा धोका टळेल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले आणि पुणे शहरासाठी ‘डक्ट पॉलिसी’ अमलात आणावी, अशी सूचनाही शासनाला केली.

See also  खडकवासला मतदार संघातील 27 मतदान केंद्रे स्थलांतरित; मतदारांच्या सोयीसाठी बदल