बाणेर : विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी. विद्यार्थ्यामध्ये जबाबदारी आणि बांधिलकी जागृत करण्यासाठी विद्यांचल हायस्कूल मध्ये 2025-2026 या वर्षाच्या नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीस विद्यार्थी परिषद म्हणजेच नेतृत्व समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये निवड झालेले सर्व विद्यार्थी नेतृत्व आणि जबाबदारी पूर्ण समर्पणाने पार पाडण्यासाठी तयार असतात. निवडणुकीसाठी पात्र ठरण्यासाठी सुरुवातीला उमेदवारांनी स्वतःच सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर भाषणे सादर केली होती. लोकशाही पद्धतीने संगणकावर मतदान प्रक्रिया पार पडली आणि 2025 – 26 या वर्षाची शालेय विद्यार्थी परिषद तयार करण्यात आली.
शाळेच्या पटांगणावर या विद्यार्थी परिषदेने जेव्हा कुच केली तेव्हा भव्य समारंभ सुरु झाला आणि त्याचवेळी एकतेचा आणि गतिशीलतेचा उत्साह भरला. त्यांचे नेतृत्व हेड बॉय युवराज सुतार आणि हेड गर्ल श्रेया धस यांनी केले. नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी, प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे माजी चेअरमन श्री विजय कोलते यांच्या हस्ते त्यांचा प्रतिष्ठेचा ध्वज व बॅज स्वीकारून संस्थेचा सन्मान आणि गौरव टिकवून ठेवण्याचा संकल्प केला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच आरोग्याकडेही मुलांनी लक्ष द्यावे असे सांगितले. संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्त्वही सांगितले. तन सुदृढ असेल तर मनही सुदृढ राहते असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला अभिनव शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. अशोक मुरकुटे कार्यकारणी सदस्य रंजना मुरकुटे, श्री भालचंद्र मुरकुटे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा कुलकर्णी व उपमुख्याध्यापिका सौ.रूपाली भावसार तसेच इतर शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होता.
आपल्या मुलांनी मोठी जबाबदारी स्वीकारून नवीन प्रवास सुरु केला हा क्षण सर्व पालकांसाठी अभिमानाचा गौरवाचा क्षण होता.
मुख्याध्यापिका सौ. मनिषा कुलकर्णी यांनी शपथ घेतली व भाषण करून मुलांना जीवनातील सर्व अडथळे आणि आव्हाने पेलून पुढे जाण्याची प्रेरणा दिली.