औंध : हिंजवडी परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पीएमआरडीएमार्फत नवीन पर्यायी रस्त्यांची आखणी केली जात आहे. या रस्त्यांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात, महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी औंध येथील कार्यालयात स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करत भूसंपादन प्रक्रियेसाठी समन्वयाचा दृष्टिकोन अंगीकारला जात आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिली तर त्यांना २५ टक्के अधिकचा मोबदला शासनाकडून मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. भूसंपादनासाठी थेट खरेदी, संमतीने खरेदी, टीडीआर, इन्सेटिव्ह एफएसआय अशा विविध पर्यायांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
हिंजवडी, माण, मारुंजी भागातील प्रस्तावित रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान बाधित शेतकऱ्यांना टीडीआर (TDR) देणार असल्याचे आवाहन महानगर आयुक्त यांनी लेखी पत्राद्वारे केले आहे. यामध्ये पांडवनगर ते माण गावठाण ते फेस ३ (टी जंक्शन), लक्ष्मी चौक ते पद्मभूषण चौक ते विप्रो सर्कल, मेझानाईन ते लक्ष्मी चौक, लक्ष्मी चौक ते मारुंजी, शिंदे वस्ती ते जगताप चौक (कासारसाई रोड), मधुबन हॉटेल (PMC हद्द) ते शिवाजी चौक या प्रस्तावित रस्त्यांचा यात समावेश असून संबंधित शेतकऱ्यांनी याचा लाभ घेता येणार आहे.