रेवड्या संपल्या आणि आता नुसताच ढोल! सरकारचे आर्थिक नियोजन फसले – आम आदमी पार्टीची सरकारवर टीका

पुणे : अभूतपूर्व पूरपरिस्थिती मधून अजून शेतकरी, शेतमजूर सावरलेला नाही. त्यात त्याला कुठलीही मदत अजून आली नाही. दुसरीकडे सणाला,दिवाळीमध्ये जो ‘ आनंदाचा शिधा’ दिला जात होता तोही आता दिला जाणार नाही. आता तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे तीही योजना बंद झाल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना आमिष म्हणून  भाजप आणि युती सरकार सातत्याने घोषणा करीत होते. परंतु आता महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळे आता गणेश उत्सवामध्ये सुद्धा आणि आता येणाऱ्या दिवाळीमध्ये सुद्धा रेशन दुकानात कोणताही आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाला राज्योत्सवाचे स्वरूप जाहीर केले त्या निमित्ताने मोठमोठ्या जाहिराती केल्या परंतु सामान्य जनतेला रेशन मध्ये कोणतेही गोडधोड पदार्थ दिले नाहीत. दरम्यान अभूतपूर्व अशी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर शेतकरी, शेतमजूर हे कोलमडून पडलेले असताना आता दिवाळीच्या निमित्ताने दिला जाणारा आनंदाचा शिधा म्हणजे चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल या वस्तूपण आता दिल्या जाणार नाहीत. सरकारच्या उधळपट्टीमुळे लोकांना आवश्यक असलेले, पूर्वी दिले जाणारे रेशनवरचे पदार्थ आधीच कमी झालेली आहेत. त्यात पूर्वीची शिवभोजन थाळी योजना सुद्धा बंद केल्यात जमा आहे. गाजावाजा केलेली *तीर्थाटन योजना सुद्धा बंद पडल्यात जमा आहे.

हे सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दर्शवते. सरकारवरचे कर्ज प्रचंड वाढले आहे आणि तथाकथित रेवडी वाटप आता शक्य नाही. यातील गंभीर बाब म्हणजे अनेक कल्याणकारी योजनांना कात्री लावली जात आहे. सरकार नियोजनामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतमजुरांच्या घरात अन्न नसताना, त्याला कुठलीही नुकसान भरपाई मिळालेली नसताना किमान रेशन द्वारे थोडी मदत होऊ शकली असती. परंतु सरकार गणेशउत्सवाच्या मोठ्या जाहिराती करण्याला प्राधान्य देत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

See also  पुष्प प्रदर्शनाची परंपरा युवकांनी जपावी -सुहास दिवसे