पुणे (प्रतिनिधी) – देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळीकडे चर्चा राजकारणाची अन गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काय केले याचीच सुरू आहे. याचा अनुभव पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप– शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट)व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळा यांनी झैनी मशिदीला दिलेल्या भेटीतही आला.
भाजपाचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी हे आयोजन केले होते. यावेळी मोहोळ यांनी कोढवा परिसरातील फक्रीहिलच्या झैदी मशिदीला भेट दिली. सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने नमाजअदा करण्यासाठी मशिदीत चांगलीच गर्दी होती. नमाज अदा झाल्यावर मोहोळ सहका-यांसह तिथे पोचले. यावेळी अमीलसाहेब जमालुद्दीन, शेख कुतुबखान, सुजरम नगरवाला, शोएब इंडोनेशियावाला, शोएब रामपुरावाला, मोयेड नुरूनी आदी प्रमुख मंडळींसह मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. यासर्वांनी समाजाच्या वतीने मोहोळ यांचे स्वागत केले.
यावेळी सर्वांशी अनौपचारिक गप्पा मोहोळ यांनी मारल्या. या गप्पांच्या केंद्रस्थानी गेल्या दहा वर्षातील मुस्लिम समाजाने घेतलेले सरकारचे अनुभव होते. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणयात कोणताही भेदभाव होत नाही असे यापूर्वी काधीही अनुभवास न आलेला अनुभव आज देशातील सर्व धर्म, जाती पंथाचे लोक घेत आहेत. तसेच तिहेरी तलाकचाही उल्लेख आवर्जून यावेळी करण्यात आला. विश्वकर्मा योजनेचा चांगला फायदा मुस्लिमसमाजातील तरूणांना मिळणार असल्याचे मत काही तरूणांनी व्यक्त केला.