प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांचा ‘नेक्स्टजेन रिसर्चर अवॉर्ड -२०२५’ ने व्हिएतनाममध्ये गौरव!

पुणे : न्हा ट्रांग युनिव्हर्सिटी, व्हिएतनाम येथे आयोजित “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन नेटवर्किंग अँड कोलॅबोरेशन विदिन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड अवॉर्ड्स-२०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या मंचावर भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांना ‘नेक्स्टजेन रिसर्चर अवॉर्ड-२०२५’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले. हा सन्मान भारती विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला आहे.

हा पुरस्कार न्हा ट्रांग युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू प्रा. डॉ. फाम क्वोक हंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संशोधन, नवोन्मेष आणि शैक्षणिक नेतृत्व या क्षेत्रांतील डॉ. प्रदीप जाधव यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.

“लिंकिंग इनोव्हेशन, एन्व्हायर्नमेंट अँड सोसायटी: रिसर्च पाथवेज टुवर्ड्स अ सस्टेनेबल फ्युचर” या विषयावर त्यांनी दिलेले कीनोट व्याख्यान आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींकडून विशेष प्रशंसेस पात्र ठरले. त्यांच्या सादरीकरणातील दूरदृष्टी, विषयाची सखोलता आणि जागतिक शाश्वततेशी असलेला संबंध यामुळे त्यांचे विचार परिषदेत उपस्थित सर्वांना प्रेरणादायी ठरले.

या उल्लेखनीय यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा. डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम आणि भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका मा. डॉ. अस्मिताताई जगताप यांनी डॉ. प्रदीप जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, “डॉ. प्रदीप जाधव यांनी संशोधन आणि शैक्षणिक नेतृत्वात सातत्याने उत्कृष्टतेचा ध्यास घेत संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांचे हे यश भारती विद्यापीठाच्या प्रगतिशील दृष्टीकोनाचे आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या परंपरेचे प्रतिबिंब आहे.”

संस्थेतील सर्व शिक्षकवर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या अभिमानास्पद यशाबद्दल डॉ. प्रदीप जाधव यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

See also  पालिकेच्या फेर प्रभाग रचना करा निवडणूक आयोगाचे आदेश