पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी ३० जुलै रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या गैव्यवहारप्रकरणी संस्थेने चौकशीचे आदेश दिले आहेत.
महाज्योतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी ३० जुलै रोजी घेतली होती. परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रश्नपत्रिकेत काही विशिष्ट प्रशिक्षण संस्थांच्या पुस्तकातील प्रश्न विचारल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयाकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरता मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे महाज्योतीच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी कळविले आहे.
त्यादृष्टीने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी प्राप्त तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. चौकशी अहवाल प्राप्त होताच त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी अपप्रचाराला बळी पडू नये तसेच मनात कोणताही संभ्रम ठेवू नये, असेही महाज्योतीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.