कोथरूड : प्रभाग क्रमांक 30 (कर्वेनगर) मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यात मुख्य लढत होणार असे मानले जात आहे, महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढल्यास अटीतटीचा सामना पहावयास मिळेल. प्रभागात परिवर्तन होणार का?, याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जुना प्रभाग 31 (कर्वेनगर) असलेला नव्या प्रभाग 30 (कर्वेनगर) चा सारखाच राहिला आहे. काही स्थानिक नगरसेवकांच्या विरुद्ध येथील सर्व पक्षांतील दहा-बारा प्रमुख कार्यकर्त्यांनी परिवर्तन आघाडी स्थापन केली. प्रभागाचा विकास झाला नाही, असा मुद्दा मांडत त्यांनी प्रस्थापीतां विरुद्ध प्रचार सुरू केला होता. परिवर्तन आघाडीचे फलक चौकाचौकात झळकले देखील होते. त्यामुळे प्रभागात आपोआपच राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपने या प्रभागात चांगले यश मिळविले. त्यापूर्वी मनसेचे नगरसेवक या प्रभागातून निवडून आले होते. जुन्या प्रभाग 31 मध्ये भाजपचे राजा बराटे, सुशील मेंगडे आणि वृषाली चौधरी, तर चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाने हे चौघेजण निवडून आले होते. दोन पक्ष वेगवेगळे झाले असून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या लक्ष्मी दुधाने या शरदचंद्र पवार गटाकडे जाणे पसंत केले आहे. यावेळी भाजप व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित असली, तरी आघाडी झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या उमेदवारांशी लढा देताना भाजपची दमछाक होणार आहे.
भाजपकडून नगरसेवक राजा बराटे, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी हे तीन नगरसेवक, तसेच महेश पवळे, शीतल सोमनाथ गुंड, विनोद मोहिते, डॉ . एकता विशाल रामदासी हे इच्छुक आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका लक्ष्मी दुधाने, स्वप्नील दुधाने, किशोर शेडगे, प्रमोद शिंदे, विष्णू सरगर हे प्रमुख इच्छुक आहेत. काँग्रेसकडून विजय खळदकर यांनी गेल्या निवडणुकीत चांगली लढत दिली होती, ते यावेळीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत परंतू मागील काही महिन्यापूर्वी कार्यालयावरील पक्षाचे चिन्ह काढलेले असल्याने नेमके कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेत उभे राहणार आहेत की अपक्ष उभे राहणार हे पाहणे औत्सुक्य आहे.
शिवसेना (उबाटा गट) कडून अजय भुवड, नंदू घाटे, जगदीश दिघे, वैशाली दिघे, दिनेश बराटे निवडणूक लढवू इच्छितात. मनसेकडून सचिन विप्र, शैलेश जोशी, कैलास दांगट, सुरेखा मकवान, संजय नांगरे हे प्रमुख इच्छुक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तेजल दुधाने, प्रवीण दुधाने, आनंद तांबे, संतोष बराटे, संगीता बराटे हे इच्छुक आहेत.
महाआघाडी झाल्यास, तिन्ही पक्षांचे एकत्रित पॅनेल उभे राहील. त्याची एकत्रित ताकद ही प्रभागातील काही जागा जिंकू शकेल. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने, उमेदवार निवडीवरून कार्यकर्त्यांत नाराजी पसरणार आहे. त्याचा फटका अनेक प्रभागात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कर्वेनगरमध्ये आघाडी व भाजप यांच्यात अटीतटीची लढत पहावयास मिळणार आहे.
प्रभाग आरक्षण – १.(अ) – ओबीसी २(ब) -सर्वसाधारण महिला ३(क) – सर्वसाधारण महिला ४(ड)- सर्वसाधारण
अशी आहे प्रभागरचना
कर्वेनगर, स्टेट बँक नगर, हिंगणे होम कॉलनी, इंगळे नगर, कमिन्स
कॉलेज, तपोधाम, काकडे सिटी, कल्पतरू कॉलनी, अमृत कलश
सोसायटी, ज्ञानदीप कॉलनी, मयूर कॉलनी,श्रमीक वसाहत, चंद्रलोक नगरी, वनदेवी मंदीर, कामना वसाहत, हिंगणे बुद्रुक, मावळे वस्ती, मनोदय कॉलनी, एकता कॉलनी, आनंदनगर हे भाग प्रामुख्याने येतात. वारजे महामार्ग ते राजाराम पूल, वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते लक्ष्मीनगर झोपडपट्टी, कर्वेनगरमधील सर्व गल्लीचा भाग या प्रभागाच्या हद्दी आहेत.






















