मुंबई, दि. ११ : एआय-जनरेटेड कंटेंटची पडताळणी आता आवश्यक असून डीपफेक तपासासाठी आता १५–२० पॅरामीटर्सवर आधारित विशेष टूल्स तयार झाली आहेत. त्याचबरोबर, फॅक्ट-चेकिंग संस्थांही सर्व फॅक्ट्स पडताळत नाहीत. त्यामुळे पूर्वग्रह असू शकतो. ‘एआय’मधील बायस हा आज जागतिक पातळीवरील मोठा प्रश्न आहे, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ तसेच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात आयोजित वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यम पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, ‘एआय’ हे सत्याचा स्रोत नाही. ते माहितीचे स्वरूप बदलू शकतात, सारांश देऊ शकतात, पण ते सत्य ठरवू शकत नाही. नव्या पिढीचे टूल्स (उदा. रिअल-टाइम सर्च करणारी AI) अनेक स्रोतांमधून माहिती गोळा करून त्वरित सारांश देऊ शकतात. हे पत्रकारांना त्वरित संदर्भ देऊन रिपोर्टिंग सोपे करतात; परंतु या माहितीचे स्रोत तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी आर्वजून सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मिळालेल्या संदर्भांवर मानवी पडताळणी नसतानाही निष्कर्ष देणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच मानवी नियमन आणि पडताळणी अनिवार्य असावी, असे त्यांनी ठळकपणे नमूद केले.
संवेदनशील किंवा दस्तऐवजीकरण ऑनलाईन टूल्समध्ये अपलोड करण्यापूर्वी सतर्कतेची गरज असल्याचे मत व्यक्त करत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, ऑनलाईन प्रश्न, अपलोड केलेली सामग्री आणि शोधमागील ट्रेस कायम राहतात आणि संबंधित कायदेशीर चौकशीत प्राप्त करण्यायोग्य असू शकतात. त्यामुळे गोपनीय माहिती शेअर करताना व्यवस्थात्मक व कायदेशीर बाबी समजून घेणे गरजेचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘एआय’ कधीकधी खोटे संदर्भ तयार करू शकते, त्यामुळे वैज्ञानिक किंवा कायदेशीर बाबींमध्ये ‘एआय’ वर अवलंबून राहणे धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. डीपफेक तयार करणे सोपे झाले आहे, परंतु ते शोधणे कठीण होत चालले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘एआय’ जनरेटेड कंटेंटवर वॉटरमार्किंगसारखे नियमन असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रधान सचिव सिंह यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता हे शक्तिशाली साधन आहे परंतु त्याचा वापर करताना स्रोत-पुष्टीकरण, गोपनीयता संवर्धन, कायदेशीर जबाबदाऱ्या आणि मानवी नियमन या सर्व गोष्टींना प्राथमिकता द्यावी. त्यांनी सांगितले की, ऑफलाइन, एन्क्रिप्टेड आणि स्थानिक जीपीयू-वर चालणाऱ्या वातावरणात संवेदनशील तपासणी करणे सर्वोत्तम पद्धत आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने पत्रकारितेतील कार्यप्रणाली व कायदे यात पत्रकारांनी सतत अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.























