डोंगर फोडून केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे सुसगाव परिसरामध्ये समस्यांच्या डोंगरात वाढ

सुस : सुसगाव येथील मुख्य रस्त्यावरील जोगेश्वरी, भुलेश्वर मिसळ परिसरामध्ये टेकडी फोडून बांधण्यात आलेल्या अनाधिकृत व्यावसायिक बांधकामामुळे आधीच अपूर्ण असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच बेकायदेशीर डोंगर फोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या परिसरात माळीन सारखी दुर्घटना होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.

हिंजवडी आयटी पार्क साठी जाण्या येण्यासाठी एक प्रमुख रस्ता म्हणून सुस रोडचा वापर करण्यात येतो. हा रस्ता रुंदीकरण करण्याचे मागणी सातत्याने होत असताना चढाच्या रस्त्यावरती अनाधिकृत बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो.

जोगेश्वरी मिसळ च्या समोर मोठ्या प्रमाणात डोंगर फोड करून व्यावसायिक दुकाने उभारण्यात आली आहेत. यामुळे सुसगाव परिसरातील वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आदी सुविधांवर ताण निर्माण होत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

अनाधिकृत टेकडी फोडण्यात आली असून शासनाचा या परिसरात महसूल बडवण्यात आला आहे का याची देखील सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई आवश्यक असून सुसगाव परिसरातील परिसराचे बकालीकरण थांबवणे आवश्यक आहे.

डोंगर फोडीमुळे दरड कोसळण्याची वाट न पाहता तसेच वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून रस्ता रुंदीकरण याकडे पुणे महानगरपालिकेने तातडीने लक्ष द्यावे व या परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार