पिंपरी, पुणे : सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन २७ जानेवारी २०२६ रोजी आणि समारोप ३१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या स्पर्धेत कबड्डी, हॉकी, हॅन्ड बॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि टेनिस बॉल या सांघिक स्पर्धा होणार आहेत. तसेच ऍथलेटिक्स, तिरंदाजी (आर्चरी), बुद्धिबळ, पोहणे, पंजा लढत, बॅडमिंटन, डार्ट गेम, ज्युडो, कराटे, वेटलिफ्टिंग टेबल टेनिस, लॉन टेनिस, योगा, एअर पिस्टल आणि एअर रायफल या वैयक्तिक स्पर्धा देखील होणार आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये तीस वर्षांपुढील स्त्री, पुरुष सहभाग घेऊ शकतात. पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा संकुल, जलतरण तलाव व स्टेडियम मध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये देशभरातून पाच हजार पेक्षा जास्त नामांकित खेळाडू सहभाग घेतील अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार यांनी दिली.
मंगळवारी, पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंह संघा, सचिव शैलेश फुलसुंगे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुदळे आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे बोधचिन्ह “शुभंकर – शेकरू” याचे अनावरण विनोद कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १० जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करता येईल ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन नोंदणीसाठी www.mastersgames.in या संकेतस्थळावर किंवा ऑफलाईन नोंदणीसाठी संस्थेचे सरचिटणीस शैलेश फुलसुंगे (९७६४९२९१७१) यांच्याशी संपर्क साधावा.
सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेची स्थापना २०१७ मध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ. अनमोल रतन सिद्धू व संस्थापक सरचिटणीस विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. २०१७ मध्ये पहिल्या मास्टर गेम्स स्पर्धा चंदिगड मध्ये घेण्यात आल्या. यावेळी विविध १० स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये २००० स्त्री, पुरुष स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. डेहराडून, बडोदा, त्रिवेंद्रम, वाराणसी, गोवा आणि धर्मशाळा अशा विविध राज्यात यापूर्वीच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये ३३००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. एप्रिल २०२५ मध्ये धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत पंजाब येथील १०२ वर्षाचे जेष्ठ नागरिक जगीर सिंह यांनी १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मुलगा आणि नातू यांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतला होता. नागरिकांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड, पुणे महाराष्ट्र येथे प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजन समितीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष विनोद कुमार, उपाध्यक्ष रामसिंग संघा, चंद्रशेखर कुदळे, सचिव शैलेंद्र फुलसुंघे, सहसचिव मुकेश राजाराम पवार, ॲड. सत्यवान वाघमोडे, सचिन नाडे, पौर्णिमा जाधव, शशिधर आर. आणि कार्यकारणी सदस्य जॉर्ज टी., राजू शर्मा, अनिकेत काणेकर, अमित पवार, शिवाजी बांदल, राजेंद्र महाजन, श्रीकांत देशपांडे, प्रदीप कासार, संकेत साळुंखे, समन्वयक सुचिता कडेठणकर आणि नितीन जोशी यांचा समावेश आहे.























